वृत्तसंस्था - बुधवारी आणि गुरुवारी पृथ्वीवरून आणखी एका नव्या धोक्याचा सामना करावा लागणार आहे. आज एक नवीन सौर उद्रेक पृथ्वीवर धडकण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे बुधवार आणि गुरुवारी भूचुंबकीय वादळ येण्याची शक्यता आहे.
एक आठवड्यापूर्वीही असेच वादळ आले होते. पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चच्या सेंटर ऑफ एक्सलन्स इन स्पेस सायन्सेस (CESS) ने ट्विट करून या सौर उद्रेक आणि भुचुंबकीय वादळांची माहिती दिली आहे.
CESS नुसार 6 फेब्रुवारी रोजी सूर्याच्या दक्षिणेकडील भागात फिलामेंटचा स्फोट दिसून आला. या सौर स्फोटाची नोंद सोलर हेलिओस्फेरिक ऑब्झर्व्हेटरी (SOHO) मिशनच्या लार्ज अँगल आणि स्पेक्ट्रोमेट्रिक कोरोनाग्राफ (LASCO) द्वारे करण्यात आली आहे.
SOHO हे नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीचे संयुक्त अभियान आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी या मिशनची स्थापना 1995 मध्ये करण्यात आलेली आहे.
CESS ने ट्विटमध्ये म्हटले आहे की, 9 फेब्रुवारी रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 11.18 ते 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.23 पर्यंत पृथ्वीला मध्यम स्तराच्या भुचुंबकीय वादळाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
त्याची रेंज 451-615 किलोमीटर प्रति सेकंद असू शकते. याचा परिणाम फारसा घातक असण्याची शक्यता नाही. सौर वादळे भुचुंबकीय क्रियाकलाप वाढवू शकतात.
परंतु, यामुळे दळणवळण प्रणाली, प्रक्षेपण यामध्ये समस्या असू शकतात. भुचुंबकीय वादळांमुळे दळणवळण प्रणाली, प्रसारण, रेडिओ नेटवर्क, नेव्हिगेशन इत्यादींमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात.
यापूर्वीही आलेले वादळ
पृथ्वीवरील सौर वादळाचे सर्वात वाईट रूप मार्च 1989 मध्ये दिसले होते, जेव्हा कॅनडाची हायड्रो-क्यूबेक वीज प्रेषण प्रणाली सौर वादळामुळे 9 तासांसाठी ब्लॅक आउट झाली होती.
काय आहेत भुचुंबकीय वादळे ?
भुचुंबकीय वादळामुळे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात मोठा बदल होतो. जेव्हा सुर्याकडून येणारे चार्ज केलेले कण पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी आदळतात, तेव्हा भुचुंबकीय वादळ उद्भवते. त्यामुळे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये काही काळ व्यत्यय येतो.