चुंबन, मुका म्हटलं की ते खूप जुन गाणं आठवतं, 'अ, अ आई, म, म मका, मी तुझा मामा, दे मला मुका..." लहानशी सोनुली भाची अन लडिवाळपणे मागे लागलेला वात्सल्यमूर्ती मामा...
आता तसा युरोपियन लोकांनी आंतरराष्ट्रीय चुंबन दिवस ६ जुलैला जाहिर केलेला आहे. युरोपियन लोकांमध्ये चुंबनाचेही प्रकार आहेत बरं.. अर्थात त्यांच्या जगण्यात ते कांही औपचारिकता काटेकोरपणे पाळतात.
गालावर, कपाळावर घेण्यात येणारे चुंबन हे आपुलकी, आदर दाखवायला, हस्तांदलोन झाल्यावर हाताचे घेण्यात येणारे चुंबन वरिष्ठांविषयी आदर, नम्रता दाखविण्यासाठी, मैत्रिणीच्या समोर गुडघ्यावर बसून तिच्या हाताचे चुंबन म्हणजे स्त्रीदाक्षिण्य दाखविण्याचा भाग..
स्त्रीसमतेचे पाश्चात्त्यांचे धडे गिरवायला हरकत नाही. इतकं आदराने अन प्रेमाने वागतात.. मैत्रिण, सहकारी किंवा कोणीही असो.. जेवायला बसताना तिची खुर्ची किंचित मागे ओढून सन्मानाने ती बसल्यावर मगच आपण बसणं..
किंवा गाडीचा दरवाजा सुहास्य वदनाने तिच्यासाठी उघडून ती बसल्यावर बंद करणं. असो.. म्हणाल स्वप्नजा फारच कौतुकतेय आज पाश्चात्त्यांविषयी.. तसं नाही, तर हे समतेचे द्योदकच आहे.
खूप दिवसांनी भेटल्यावर हलकीशी झप्पी अन ओठावरचे चुंबन. लहान मुले, वृध्द यांचे कपाळ चुंबणे म्हणजे केवळ ममताच ना..! प्रियकर प्रेयसी, पती पत्नीमधील चुंबन म्हणजे परंस्परांमधील आकर्षणाबरोबर प्रेमही आहेच की.
चुंबन प्रणय, प्रेमापलिकडे विस्तारलेली एक कृती आहे. प्रेम, जिव्हाळा यांची अभिव्यक्ति आहे. आपल्या इथे तेवढा मोकळेपणा नाही अजून. पण या साऱ्यात एका कवितेच्या दोन ओळी आठवताहेत.
'सुंदरतेच्या फुलांवरचे दव चुंबून घ्यावे.. अन चैतन्याच्या कोवळ्या उन्हात हिंडावे...' सुंदरता अशी अलवार टिपायची असते तर ते चैतन्याचे कोवळे ऊन मिळते आपल्याला..!
रायगडावर गेल्यावर मन अभिमानाने, आदराने भरुन येतं. आणि प्रत्येक मराठी मनाची गात्र न गात्रं गाऊ लागतात..
"या ओठांनी चुंबूनी घ्यावी
हजारदा ही रायगडाची माती,
अनंत मरणे झेलून घ्यावी,
इथल्या जगण्यासाठी..'
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)