बापूजींची हत्या होऊन आज ७४ वर्ष झाली. बापूजींना मिळालं तितकं प्रेम आणि टोकाचा तिरस्कार कुणाच्याच वाट्याला आला नसेल. बाबांनी 'सत्याचे प्रयोग' दिलं तेव्हा मी प्रथम वाचलं तेव्हा सत्याचं आयुष्यातील महत्व अधोरेखित होत गेलं. बाबांनी सांगितलं आपण सामान्य माणसं आहोत. गांधी जगणं फार अवघड आहे. फक्त आपण चांगला माणूस होणं महत्त्वाचे.
बापूंनी केलेली चोरी मग वडिलांसमोर त्याची कबुली देण.. वडिलांच्या क्षमेच्या अन स्वतःच्या पश्चात्तापाच्या अश्रुत वाहून जाणं, वाचताना कुठल्याही चांगल्या माणसाचे डोळे ओलावल्या शिवाय रहाणार नाही.
गांधी तुमच्या-आमच्यासारखेच होते. साधे. चुका करणारे. पण त्यांचा महात्मा, राष्ट्रपिता होण्यापर्यंतचा प्रवास त्यांच्या स्वतःतील अतुलनीय शाक्तितच होता. ते सतत आत्मशुध्दीची प्रक्रिया करत राहिले. आणि स्वतःला घडवत राहिले. तिथे कुठेही मोठेपणाचा आव नव्हता.
आजकल स्वातंत्र्यप्राप्तिवर हक्क सांगणारे बरेच आहेत. पण अनिल अवचट एके ठिकाणी लिहतात,' १८५७ च्या लढ्यापासून तो गांधीप्रणित चळवळीपर्यंत अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. पण भारतातील सामान्य माणसापर्यंत स्वातंत्र्याची इच्छा मनामनात पेरली.
बापू भारतव्यापी आहेत पण जगाच्या कानाकोपऱ्यात सर्व थरात प्रभाव टाकलेली व्यक्ति आहेत. किती खरं आणि बरोबर लिहिलंय बाबांनी.
कृष्णवर्णियांना न्याय देण्यासाठी बापूजींनी उभारलेला लढा जगभराला अहिंसेने लढायला प्रेरणा देत गेला. कॕलिफोर्नियातील मेक्सिकन मजुरांचा नेता बापूजींचा आदर्श घेऊन वीस-वीस दिवस उपवास करायचा. तेही बापूजींचा फोटो समोर ठेवून.
मार्टिन ल्यूथर किंग या कृष्यवर्णिय नेत्यांनी आपल्या आत्मचरित्रात जागोजागी बापूजींच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केलीय. लॉर्ड माऊंटबॕटन हे शेवटचे व्हाईसराॕय आणि ते ब्रिटिश घराण्यातील ते म्हणतात, 'इतिहासाच्या पानावर गांधाजींचे नांव ख्रिस्त आणि बुध्द यांच्या बरोबरीने लिहले जाईल.
गांधीहत्या झाल्यावर आइनस्टाईन म्हणाले होते, 'गांधी सारखी महान व्यक्ति कधीकाळी या भूतलावर जन्मली होती. तिने करोडो लोकांचे हृदय जिंकले होते. यावर पुढच्या पिढ्यांचा विश्वास बसणार नाही.
सुर्य तेजस्वी आहे हे कुणाला सांगायची गरज नाही. राष्ट्र सेवा दलात यदुनाथकाका एकेक प्रसंग सांगत, तसेतसे गांधी आवडत गेले. समजत गेले, असं म्हणणे, तेही माझ्यासारख्या सामान्य स्त्रीने फार धाडसाचं ठरेल.
आता आपली प्रगती होतेय नाही म्हणत नाही. पण ती तळागाळातील माणसं त्यांच्यासाठी आपण काही करणार आहोत का ? ती प्रगती जी बापूजींना हवी होती.ती व्हायला हवीय...
त्यांची काही गोष्टींवर असलेली ठाम मतं. 'खेड्याकडे चला'. रोजगार जर तिथेच उपलब्ध झाला तर लोक गांव सोडणार नाहीत. आपल्याच गावात आपल्याला लागणाऱ्या वस्तू उपलब्ध झाल्या तर माणूस गाव सोडणार नाही.
विष्ठेपासून इंधन निर्माण करणे, खेड्यातील वस्तू खेड्यातच वापरा. अशा कितीतरी गोष्टी... तुम्ही बापूजींच्यावर टीका करु शकता, पण त्यांच्यासारखं वागूच शकणार नाही तुम्ही...!
बापूजींचे तत्वज्ञान साधे सोपे होते. या अवाढव्य पणाखाली सर्वसामान्य चेपले जातात. या शहरीकरणाच्या हव्यासापायी खेडी उदास. म्हातारी होत गेलीत. प्रगती तळातल्या माणसांपर्यंत पोहचलीय का, हे आत्मपरीक्षण आजची गरज आहे.
नैतिकता ही गांधीजींच्या जगण्याचा गाभा होता. आज कुठेय नैतिकता ? आज ३० जानेवारी. बापूजींचा स्मृतीदिन. शेवटी एवढचं म्हणेन. बापूजीं आपण गेलात आणि नैतिकता विधवा झाली. सुशिक्षित (?) माणसांची अधोगती पाहून ती खंगत खंगत मरुन गेली. नवनेत्यांनी तिला तुमच्या समाधीशेजारीच दफन केली.
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)