अनिरुध्द तिडके (अहमदनगर) - लोणी (ता. राहाता) येथील एका माजी सैनिकाला सेवानिवृत्तीनंतर वर्क फ्रॉम होम (Work From Home) शोधणे चांगलेच महागात पडले आहे. सोशल मिडियावर ओळख झालेल्या एका व्यक्तीने त्यांना अशा प्रकारची नोकरी शोधून देण्याच्या नावाखाली तब्बल १८ लाख ३९ हजार रुपयांचा गंडा घातला आहे.
ही फसवणूक करणार्याला नगरच्या सायबर पोलिसांनी अटक केली ओह. सलाहुद्दीन शहाबुद्दीन खान (वय ५२, रा. गणेशनगर, वेल्फेअर सोसायटी, कांदिवली, मुंबई) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने ऑनलाईन संकेतस्थळाच्या नावाखाली माजी सैनिकाला गंडा घातला होता. ही घटना ८ ते २३ नोव्हेंबर २०२१ दरम्यान घडली.
लोणी येथील फिर्यादी ‘वर्क फॉर्म होम’ करता येईल अशा नोकरीच्या किंवा उद्योगाच्या शोधात होते. एका ऑनलाईन साईटवर याबाबत माहिती घेत असताना त्यांची एका महिलेशी ओळख झाली. तिने त्यांना ‘शॉपिंग डॉट कॉम’ कंपनीत अधिकारी असल्याचे सांगत त्यांचा आधी त्यांचा विश्वास संपादन केला.
या कंपनीचे प्रॉडक्ट (Product) खरेदी करून ते विकल्यास तुम्हाला भरपुर कमिशन मिळेल, असे महिलेने सांगितले. पैसे जमा करण्यासाठी व्हॉट्सअॅपवरून एक क्यूआर कोड पाठविला. त्याद्वारे माजी सैनिकाने कंपनीच्या साईटवरून वस्तू खरेदी करून बँक खात्यावर वेळोवेळी १३ लाख १० हजार रूपये जमा केले.
पण दुर्दैव असे की, त्यांना एकही वस्तू मिळाली नाही. १० ते २० लाख रूपयांचा टप्पा पूर्ण होत नसल्याने त्यांनी कंपनीकडे पैसे परत मागितले. पण हा टप्पा पूर्ण केल्यानंतरच रक्कम काढता येईल, असे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी पुन्हा ७ लाख रूपये भरले. ही रक्कम भरताच त्या कंपनीने बँक खाते बंद केले.
माजी सैनिकाने १० जानेवारी रोजी सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात व्यक्तीविरूध्द फसवणूक, माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलमा्न्वये गुन्हा दाखल झाला होता. सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून थेट मुंबईत जाऊन या आरोपीला ताब्यात घेतले.
त्याने गुन्ह्यााची कबुली दिली असल्याने पोलिसांनी त्याला या गुन्ह्यात अटक केली आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. अधिक तपासाकरिता त्याला पोलिस कोठडी देण्याची विनंती करण्यात आली. त्यामुळे न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, उपनिरीक्षक प्रतिक कोळी यांच्यासह योगेश गोसावी, उमेश खेडकर, दिंगबर कारखिले, मलिक्कार्जुन बनकर, राहुल हुसळे, अरूण सांगळे, वासुदेव शेलार यांच्या पथकाने आरोपीच्या मुसक्या आवळल्या.