(नाट्य समीक्षण) - पूर्णविराम : 'या' लोकांची हौस होते, पण मग इतरांचं काय.?

इतरांना काय वाटतं, याचा विचार न करता स्वत:च्या मनाप्रमाणेच जगणारी माणसं आनंदी असतीलही. पण त्यांच्यामुळे इतरांना काही त्रास होतो का, होत असेल तर ते हा त्रास का सहन करतात, अशा आशयाचं पूर्णविराम हे नाटक मंगळवारी रात्री माऊली संकुलमध्ये आयोजित हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत सादर झालं.

कोपरगावच्या कलासाई नाट्यसंस्थेने प्रसिद्ध लेखक इरफान मुजावर यांनी लिहिलेलं पूर्णविराम हे नाटक सादर केले. एक चित्रकार ‘मनोहर’ (शैलेश शिंदे), त्याची बायको ‘अनिता’ (प्रियंका शिंदे) व प्रेयसी ‘माधवी’ (रुचिता देशमुख) या तिहेरी नात्यांवर या नाटकाचं कथानक आधारित आहे. कॅन्सरमुळे अखेरच्या घटका मोजत असलेल्या मनोहर एका रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल आहे.

आयसीयूच्या बाहेर बसलेल्या अनिता आणि प्रेयसी माधवी एकमेकींना तुच कशी मनाेहरच्या अवस्थेला जबाबदार आहे, हे बोलत असतात. मनोहर या लहरी आणि तितक्याच स्वार्थी चित्रकाराला आपण लवकरच मरणार आहोत, याची जाणिव झालेली असते. म्हणून तो प्रत्येक क्षण फक्त स्वत:च्या मनासारखांच जगत राहतो.

कॅन्सरग्रस्त मनोहर किती दिवस जगणार, याची डॉक्टरांनाही खात्री नाही. पण मनोहर किती का दिवस असेना, आपल्या मनाचे चोचले पूर्ण करत राहातो. याचा त्रास त्याची पत्नी व प्रेयसी दोघींनाही होत राहातो. तो दारू, सिगारेटचे व्यसन करत असतो. बायको अनिता त्याला व्यसनांपासून दूर ठेवण्याचा, समजवण्याचा प्रयत्न करते.

पण त्यामुळे दोघांमध्ये सतत वाद होत राहतात. दुसरीकडे मनोहरची प्रेयसी माधवी त्याचा हा स्वभाव समजून घेत त्याला एखाद्या लहान मुलाप्रमाणे त्याचे हट्ट पुरवत असते. तसेच मनोहरकडे चित्रकला शिकायला येणारा लकी (साईश कुलकर्णी) याचंही मनोहरवर अपार प्रेम आहे.

लकी मनोहरला सिगारेट आणून देताे. त्याचे दारूचे पेग भरून देतो. पण मनोहर जगावा, यासाठी तोही मोठी आस्था लावून बसलेला आहे. त्याचे काही संवाद नाटकात विनोदनिर्मिती करतात, तर मनोहर रुग्णालयात दाखल होतो, तेव्हा हाच लकी जे बोलतो ते ऐकून प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी उभं राहातं.

या तिघांचीही मनोहरसाठी चाललेली घालमेल नाटकात दाखवली आहे. मनोहरवर खरं प्रेम अनिताचं की माधवीचं? असा सवाल उपस्थित होतो. तेव्हा ‘क्लायमॅक्स’मध्ये अनिताने माधवीचं मनोहरवरचं प्रेम मान्य केलं, हे दाखवलंय. हेच या नाटकाचं बलस्थान आहे. मनोहरच्या जाण्यानंतर या दोघींमधली दरी नष्ट होते.

‘अनिता’ची भूमिका प्रियंका शिंदे हिने उत्तम साकार केली. ‘लकी’च्या भूमिकेला साईशने मनापासून जीव ओतला. रुचितानेही ‘माधवी’ची भूमिका छान साकारली. दिग्दर्शक शैलेश शिंदे यांनीच ‘मनोहर’ची भूमिका रंगमंचावर सादर केली. मात्र अभिनय व दिग्दर्शनाचे दुहेरी जबाबदारी उचलणं त्यांना जड गेलं.

वाल्मिक सातपुते व ओम जगताप यांनी चित्रकाराचं घर, दवाखाना व माधवीचं घर, हे नेपथ्य साकारले. कुणाल जायकर व रेखा दिवे यांनी वेशभूषेची जबाबदारी सांभाळली. नात्यांची घालमेल दाखवणााऱ्या नाटकाला पूर्णविराम नाव का दिलं, याचा मात्र प्रेक्षकांना लवकर उलगडा झाला नाही.

- अनिरुद्ध तिडके (अहमदनगर)

(MBP Live24 - फॉलो करा)

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !