(नाट्य समीक्षण) : एटीएस - भूतकाळाचं ओझं घेऊन जगणं म्हणजे..

दहशतवाद विरोधी पथकातील अधिकारी म्हटले की, कर्तव्यनिष्ठ, कठोर आणि वेळ पडली तर देशासाठी जीव द्यायलाही तयार असलेले व्यक्तीमत्व समोर येते. पण याशिवाय एक हळवं मनही असतं, यावर आपला लवकर विश्वास बसत नाही. पण हळव्या मनाचे अधिकारी असले, तर त्यांची मानसिकता कशी असते, ते दाखवण्याचा प्रयत्न केला 'एटीएस' या नाटकाने.

एकीकडे कर्तव्यनिष्ठ, खतरनाक कामगिरी करणारे आणि दुसरीकडे मनाने तितकेच हळवे असलेले संमिश्र व्यक्तीमत्व असेल तर काय होतं, हे या नाटकात दाखवण्यात आले.

हाऊसफुल्ल प्रतिष्ठान प्रस्तुत, निरंजन मार्कंडेयवार लिखित व रविंद्र रघुनाथ व्यवहारे दिग्दर्शित ‘एटीएस’ या नाटकाने सोमवारी नगर केंद्रावर हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेला सुरूवात झाली. एकाहून एक कट्टर दहशतवाद्यांना यमसदनी धाडणारी माया (पल्लवी रविंद्र व्यवहारे) आपल्याच कामगिरीवर खुश असते.

तर पुढच्याच क्षणी घरातला एक उंदीर तिला जेरीस आणतो. त्यामुळे ती चिडून ‘दहशतवादी मारणं सोपंय, पण उंदरं मारणं कठीण. कारण उंदरं सतत कुरतडत राहतात’, असं म्हणते. याच वेळी तिच्या मनात सुरु असलेल्या लढाईची आपल्याला कल्पना येते.

एका मासिकाची पत्रकार हंसा पारेख (अमृता श्रीकांत श्रीगोंदेकर) तिची मुलाखत घेण्यासाठी येणार असते. मायाच्या फोनवर बोलण्यातून प्रेक्षकांना हे समजतं. उंदराला मारण्यासाठी माया हातात रिव्हॉल्वर घेऊन धावत असते तेव्हा आरशामगून अचानक हंसा बाहेर येते. ती घरात कधी, कशी आली, या प्रश्नाने माया चकित होते.

हंसा तिला घराच्या उघड्या दरवाजातून आत आल्याचे सांगते. नंतर दोघींचा संवाद सुरू होतो. या मुलाखतीद्वारेच नाटक वेग घेतं आणि प्रेक्षकांना एकामागून एक धक्के बसत राहतात. मुलाखत घ्यायला आलेली पत्रकार नसून मायाने यमसदनी धाडलेल्या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्याची बायको असल्याचं सांगते.

नंतर ती दहशवाद्याची बायकोही नसल्याचा खुलासा होतो. अखेरिस ती एटीएसचीच एक अधिकारी असल्याचे सांगते. कुठल्या दहशतवाद्याला मारण्यासाठी किंवा कोणाच्या मारण्याचा बदला घेण्यासाठी ती आलेली नसते. तर मायाच्या मनात काय चाललंय हे पहायला ती आलेली असते.

एका कारवाईमध्ये मायाच्या हातून एका गर्भवती महिला पत्रकाराचा खून झालेला आहे, हे सत्य लपवून तिला दहशतवाद्याची बायको असल्याचं सांगितलं जातं. हेच शल्य मायाला क्षणोक्षणी बोचत असतं. पण ती महिला पत्रकार मायाच्या नव्हे, तर तिच्या आधीच दहशतवाद्यांच्या हातून मारली गेली होती, हे सांगून हंसा मायाच्या मनातलं दु:ख दूर करते. 

फक्त दोन पात्र कुठेही कंटाळा येऊ न देता नाटक पुढे नेतात. इतका वेळ रसिकांना खिळवून ठेवणं, अन् मिनिटागणिक उत्कंठा निर्माण करत राहणं, पुढे काय होऊ शकतं, किंवा काय झालं असेल, याचे अंदाज बांधणाऱ्या रसिकांना अचानक तिसराच धक्का देणं, हे या नाटकाच्या कथानकाचं वैशिष्ट्य.

पल्लवी व्यवहारे व अमृता श्रीगोंदेकर यांनी आपापल्या भूमिकांना अप्रतिम न्याय दिला. आपण जे करतोय त्याचा अभिमान असलेली, तसेच नकळत झालेल्या चुकीचा पश्चाताप बाळगणारी माया पल्लवी व्यवहारे यांनी उत्तम साकारली. तर उत्कंठावर्धक भूमिका अमृतानेही साकारली.

नाटकाचं नेपथ्य साकारताना एटीएस अधिकाऱ्याचं घर धनश्री अमोल खोले यांनी दाखवलं. अमोल खोले यांनी रंगमंच व्यवस्था, ज्योती कराळे यांनी रंगभूषा, सिद्धी निशाणदार यांनी वेशभूषा व प्रकाशयोजना पुष्कर तांबोळी यांनी सांभाळली. संगीत दिलं पराग पाठक व माणिक देव यांनी.

मायाच्या मनातलं लढाई, तिला नेमका कशाचा पश्चाताप आहे किंवा कशाचा राग आहे, याचा शोध प्रेक्षकांना घ्यायचा असतो. या सर्वांची उत्तरं हे नाटक देतंच. पण नकळत झालेल्या चुकीला आयुष्यभराचं ओझं म्हणून बाळगण्यात अर्थ नसतो, हेही अधोरेखित करतं.

- अनिरुद्ध तिडके (अहमदनगर)

( MBP Live24 - फॉलो करा)

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !