अनिरुध्द तिडके (अहमदनगर) - 'मोक्का'च्या गुन्ह्यात गेले एक वर्षांपासून फरार असलेल्या एका सराईत आरोपीला नगरच्या 'क्राईम ब्रँच'च्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. सोमनाथ रामदास खलाटे (वय २६, रा. खलाटवाडी, ता. आष्टी, जिल्हा बीड) असे त्याचे नाव आहे.
सोमनाथ याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात एक वर्षांपूर्वी जबरी चोरीचा गुन्हा दाखल झालेला आहे. यामध्ये नगर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध 'मोक्का' कायद्यानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्याला मंजुरी मिळताच या गुन्ह्यात त्याच्याविरुद्ध 'मोक्का' कायदा कलम वाढविण्यात आले.
दि. ४ मार्च २०२१ रोजी ज्ञानेश्वर किसन गजरे (वय २७, रा. निघोज, ता. पारनेर) यांनी त्यांचा ट्रक लघुशंकेसाठी रस्त्याचे कडेला थांबवला असता अज्ञात तीन आरोपी पल्सर मोटारसायकलवर ट्रकचे पाठीमागुन येवुन, ट्रकचे केबिनमध्ये घुसले होते.
त्यांनी फिर्यादी व क्लिनर यांना कोयता व चाकूचा धाकाने मारहाण करुन ४६ हजार रुपयांची रोकड व दोन मोबाईल फोन बळजबरीने चोरुन नेले होते. या घटनेबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात जबरी चोरी, मारहाण, धमकावणे या कायदा कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना स्वतंत्र पथक नेमुन आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. कटके यांनी तपास पथकाला आरोपींचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या.
सहायक पोलिस निरीक्षक गणेश इंगळे, हेड कॉन्स्टेबल बबन मखरे, मनोज गोसावी, पोलिस नाईक सुरेश माळी, विशाल दळवी, संतोष लोढे, शंकर चौधरी, देवेंद्र शेलार, शिवाजी ढाकणे व बबन बेरड हे आरोपींच्या मागावर होते.
सोमनाथ खलाटे हा गुन्हा दाखल झाला तेव्हापासून गेवराई (जिल्हा बीड) येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला शोधून ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.
त्यामुळे सोमनाथला ताब्यात घेवून एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. नगरच्या क्राईम ब्रँचच्या पथकाने थेट बीडमध्ये जाऊन त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिस अधीक्षक पाटील यांनी या टीमचे कौतुक केले आहे.
आरोपी सोमनाथ हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुद्ध आरपीएफ पुणे रेल्वे स्टेशन, लोणी पोलिस ठाण्यात, तसेच कोपरगाव व एमआयडीसी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, खुनासह दरोडा, दरोडा तयारी, जबरी चोरी करणे असे एकुण गंभीर स्वरुपाचे ७ गुन्हे दाखल आहेत.