होय, कोरोनापासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाय आवश्यकच !

कोरोनाचा धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. त्यापासून बचाव करावयाचा झाल्यास प्रतिबंधात्मक उपाय आवश्यकच आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी स्वत:चे रक्षण करुन इतरांचे संरक्षण करता येऊ शकते. कोरोना प्रतिबंधक लशीच्या दोन मात्रा घेऊन स्वत:बरोबरच इतरांनाही सुरक्षित करा.

लसीकरणामुळे कोरोना नियंत्रित होत असला तरी कोरोना होऊ नये यासाठी स्वत:सह, आपले कुटुंबीय, मित्र आणि सहकारी यांचे संरक्षण करण्यासाठी कामाच्या ठिकाणी, घरी आणि बाहेर जात असताना योग्य पद्धतीने मास्कचा वापर करणे, सुरक्षित अंतर पाळणे व हात वारंवार साबणाने धुणे, या नियमांचे पालन करणे आवश्यकच आहे.

या आजारावर नियंत्रण मिळवायचे असेल तर जीवनशैलीमध्ये बदल करून नियमित व्यायाम, योग्य आहार हे उत्तम पर्याय आहेत. सध्या ओमायक्रॉन या नवीन व्हेरीयंटचा प्रभाव वाढताना दिसतो. त्याचा प्रसार रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रवासी आगमनासाठी शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक नियमांचे तंतोतंत पालन करावे.

कोरोना हद्दपार होईपर्यंत त्रिसूत्रीचे पालन करण्याची प्रत्येकाने सवय लावणे आवश्यक आहे. सण, उत्सव, लग्नसमारंभ, भाजीमंडई, मॉल अशा गर्दीच्या ठिकाणी नियमांचे पालन करावे. कोरोना कालावधीत शाळा, महाविद्यालये बंद असल्याने मुलांचे मोठे नुकसान झाले आहे.

वयोवृद्धांना घरातून बाहेर पडणे कठीण झाले. अजूनही मुले आणि वृद्धांवर घराबाहेर जाण्यावर बंधने आहेत. याचा विचार करुन सर्वांनी आपली जबाबदारी समजून कोरोनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. कोरोना लसीकरणाच्या दोन मात्रा घेतल्या म्हणजे फिरण्याची मुभा मिळाली हा आविर्भाव चिंताजनकच आहे.

लसीकरणामुळे मला कोरोना होणार नाही या भ्रमात राहून चालणार नाही. पंढरपूर, आळंदी, भीमाशंकर, सिंहगड, शिवनेरी आदी स्थळांना भेटी देणारा युवा वर्ग आणि भाविक बेफीकिरीने वागताना दिसला. युवकांनी नियमांचे पालन तर करावेच त्याबरोबरच लसीकरण करुन घ्यावे.

3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटासाठी लसीकरण सुरू झाले आहे. 2007 किंवा त्यापूर्वी जन्मलेली मुले लसीकरणासाठी पात्र ठरणार आहेत. कोविन पोर्टलवर 1 जानेवारीपासून नोंदणी सुरू असून 50 टक्के लस ही ऑनलाईन तर 50 टक्के थेट केंद्रावर जाणाऱ्यांसाठी उपलब्ध असणार आहे.

लसीकरणासाठी आधारकार्ड किंवा इतर ओळखपत्र आवश्यक असणार आहे. 10 जानेवारीपासून लशीच्या दोन मात्रा झालेले फ्रंटलाईन वर्कर, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व 60 वर्षावरील नागरिकांना प्रतिबंधक लशीचा डोस देण्यास सुरुवात झाली आहे.

-  डॉ. राजू पाटोदकर (उपसंचालक (माहिती), पुणे विभाग)

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !