नुकतंच अहमदनगरमधून १३ जण 'केदारकंठ ट्रेक'ला जाऊन आले. तब्बल १२ हजार ५०० फूट उंच शिखराला गवसणी घालताना, आपल्या नगरकरांनी जो उत्साह दाखवला, त्याला शब्दात व्यक्त करता येणं शक्य नाही.
'केदारकंठ ट्रेक'मध्ये सर्व ट्रेकर्सना निसर्गाने मुक्तहस्ताने दान दिले. उणे १२ अंश सेल्सिअस तापमान, ऊन, निळं आकाश, तुफानी वारा, बोचरी थंडी, आणि आल्हाददायक गार हिमवर्षाव, गोठलेला 'जुडा का तलाब' असं सर्वच नगरकरांनी अनुभवलं.
तरुण आणि अनुभवी असे सर्वजण या ग्रुपमध्ये सामील होते. दहा दिवस सुरू असलेल्या या ट्रेकमध्ये प्रत्येकजण स्वतःच्या क्षमतेशी लढत होता. एकमेकांना मदत करत होता. ५ हजारपेक्षा जास्त ट्रेकर्समध्ये केदारकंठ शिखरावर प्रथम पोहोचणारे आपण नगरकरच होतो.
'साक्री' या पायथ्याशी असलेल्या खेड्यापासून पासून हा विलक्षण ट्रेक सुरू होतो. त्यातला आपला पहिला मुक्काम 'जुडा का तालाब' इथे पडतो. या तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे हा पूर्णपणे गोठलेला होता. यावर आपण मुक्तविहार करू शकत होतो.
दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करून आपण केदारकंठ 'बेस कॅम्प' इथे पोहोचतो. दुसऱ्या दिवसाचा मुक्काम इथेच असतो. इथे उणे १० अंश सेल्सिअस तापमान असते. इथून आपल्याला स्वर्गरोहिनी हिमशिखरांचं दर्शन घडते.
इथून रात्री २ वाजता आपली सुरुवात होते 'केदारकंठ' शिखर सर करण्याची. सकाळी ७ वाजता आपण शिखरावर असतो. सुर्यदेवाच्या इतक्या जवळ असून सुद्धा शीतलता जाणवत असते.
एकीकडे थंडी आपल्या शरीरातील सर्व ऊर्जा शोषून घेते असते. परंतु दुसरीकडे 'छत्रपती शिवाजी महाराजां'च्या आणि 'भारत माते'च्या जयघोषाने आसमंत दुमदुमतो, अन शरीरात ऊर्जेचा अविरत संचार जाणवत असतो. केदारकंठ शिखरावर व्यतित केलेला अर्धा तास हा अविस्मरणीय आहे.
या ट्रेकमध्ये भाग घेतलेल्या प्रत्येकाचे विशेष कौतुक. सुनील बिचकर सर, श्रावण सदाफुलें, भारती मॅम, कौस्तुभ लोया, शुभम मोरे, आदित्य कराळे, विशाल राठोड, मेघा, ऋषिकेश आणि सोमेश बारवकर सर्वांनी हा ट्रेक यशस्वीपणे पूर्ण केला, असे विशाल लाहोटी यांनी सांगितले.
ट्रेक लीडर मनाली गुगळे हिच्या व्यवस्थापन कौशल्याचे कौतुक करावे तितके कमीच आहे. Kuari paas आणि 'केदारकंठ' या दोन्ही लागोपाठ ट्रेकचे तिने केलेले नियोजन आणि व्यवस्थापन अद्वितीय होते.
- विशाल लाहोटी (ट्रेक कॅम्प, अहमदनगर)