क्राईम ब्युरो - अहमदनगर शहरातील तोफखाना पोलिस चांगलेच ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. कोविड व ओमायक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात नियमावली लागू करण्यात आली आहे. या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांवर तोफखाना पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
राज्य शासनाने लागू केलेल्या नव्या नियमावलीनुसार घराबाहेर पडताना प्रत्येक व्यक्तीला मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आलेले आहे. परंतु, अजूनही अनेक जण विनामास्क फिरत असल्याचे दिसून येत आहेे. त्यामुळे अशा नागरिकांकडून तोफखाना पोलिस दंड वसूल करत आहेत.
तीन ते चार दिवसांपासून तोफखाना पोलिसांची कारवाई सातत्याने सुरू आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील व शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखान्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी व इतर पोलिस ही कारवाई राबवत आहेत.
तोफखाना हद्दीतील सर्व प्रमुख चौकांमध्ये नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी होत आहे. कागदपत्रांची देखील तपासणी केली जात आहे. विनामास्क असलेल्या नागरिकांकडून पाचशे रूपये दंड वसूल केला जात आहे. मोटार वाहन कायद्यानुसार असलेली दंडाची थकबाकीही वसूल होत आहे.
तोफखाना पोलिसांनी रविवारी सायंकाळपर्यंत जवळपास ५५ हजार रुपयांचा दंड वसूल केला होता. नागरिकांनी कोविड नियमावलीचे कसोशीने पालन करावे, आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी केले आहे.