हो, हाच आपला भारत आहे..!
विविध संस्कृती, परंपरांनी नटलेला..
एकता, माणुसकी, बंधुभाव जपत
या भूमीवर जीव ओवाळून टाकणारा.!
चित्रकार - रवी भागवत |
भेदभाव नसतोच, तो निर्माण केला जात असतो..
विविध जाती धर्माची, एकोप्याने राहणारी..
देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर जाणारी..
आपलं घरदार, बायको, मुले अन् सारा परिवार विसरत स्वातंत्र्यासाठी आहुती देणारी..
राम रहीम संस्कृती जपताना..गंगा जमुना धाग्यांची विण रेशमी करणारी...ही भूमी, मानवतेचे प्रतिक आहे..आपली अस्मिता आहे...
आपण आपल्या जीवाला किती जपत असतो,
उद्याची स्वप्न रंगवतो,
आपल्या कुटुंबाचं आयुष्य सुखात जावं,
यासाठी कितीतरी प्रयत्न करीत असतो.
या भूमीची लेकरे,जी देशाचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी लढली,प्रसंगी आपल्या मायभुमीसाठी सर्वस्वाचा त्याग करताना,आपल्या प्राणालाही ज्यांनी किंमत दिली नाही..
त्यांनाही आपल्या सारखंच कुटुंब होतं..!
त्यांचीही काही स्वप्न होती...
सुखाची व्याख्या होती....
आपल्या कुटुंबावर जिवापाड प्रेम करीत होती ती,
त्यांची काळजी घेतं होती..
परंतू,स्वातंत्र्याचा सूर्य उगवण्यासाठी सोन्यासारख्या आपल्या आयुष्याला तिलांजली देणारे आपले हे पूर्वज...किती प्रेरणादायी आहेत आपल्यासाठी....
त्यांच्याप्रती सर्वांच्या प्रत्येक श्वासात
कृतज्ञता हवीच...
गौरव, अभिमान हवाच....!
माझा देश महान आहे...
या मातीची गरिमा, तिचं पावित्र्य,
तिचा आवाज...,
ऐकू यायलाच हवा....!
- जयंत येलुलकर (अहमदनगर)