परवा ज्येष्ठ पत्रकार सय्यद वहाब घरी आले होते. धर्मनिरपेक्ष चळवळीमध्ये गेल्या पंचवीस वर्षांपासून समाजाच्या हितासाठी काम करणारा हा आमचा मित्र.. हाडाचा कार्यकर्ता हा नेहमी स्वतः पेक्षा समाजाची काळजी घेणारा असतो.
अशी खूप सारी माणसे विविध चळवळीत आपले योगदान देत आहेत. त्यातलेच वहाब हे एक.. जयंत, परवा संध्याकाळी कार्यक्रम आयोजित केला आहे. ज्यांनी समाजाला सतत ऊर्जा दिली. त्यांचा गौरव आम्ही करतोय. तुम्हीही त्यातीलच आहात.. नक्की या, आनंद वाटेल.
कितीतरी वर्ष समाज दिंडीत उत्साहाने सहभागी होणारी ही माणसे. इतरांना मोठं होण्यात समाधान वाटणारी रफिक मुंशी साहेब, सय्यद वहाब यांच्यासारखी माणसं... हल्ली कुणाचं कौतुक करणं दुर्मिळ झालंय, अशा वातावरणात हे दीपस्तंभच म्हटले पाहिजेत.
आज कार्यक्रमाला होतो. मुकुंदनगर येथील मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहात सर्वांचं अगत्य करीत होती. पलीकडेच हाकेच्या अंतरावर शाह शरीफ दर्गा आहे..
निजामशाहीच्या काळात शाह शरीफ सुफी संत होऊन गेले. त्यांची ही दर्गा.. मालोजीराजे भोसले या ठिकाणी बाबांचं दर्शन घ्यायला नेहमी येत असतं. त्यांच्या नावावरूनच राजांनी आपल्या मुलांची नावं शहाजी शरीफजी ठेवली आहेत.
आजही कोल्हापूर, सातारा येथील भोसले घराण्याचं पुजेचं ताट संदल, उरूसच्या कार्यक्रमात कायम येतं असतं. तो त्यांचा मान आहे. अन् हा या शहराचा इतिहास आहे.
खरेतर महाराष्ट्राच्या एकात्मतेची चळवळ जर उभी करायची असेल तर त्याची ज्योत प्रथम अहमदनगर येथूनच पेटवावी लागेल. तर अशा या ऐतिहासिक ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर असलेला हा सत्कार सोहळा..
माजी समाज कल्याण अधिकारी एक उत्साही व्यक्तिमत्व कर्मयोगी प्रतिष्ठानचे रफिक मुनशी, ज्येष्ठ पत्रकार इक्रा वाचनालयाचे अध्यक्ष सय्यद वहाब व त्यांच्या मित्र मंडळाने आयोजित केलेला..!
ज्यांनी समाजासाठी आपलं काही योगदान दिलेलं तर जे आपल्या क्षेत्रात गौरवशाली कामगिरी करीत आपल्या शहराचं नावं मोठं करीत आहेत, त्यांना शुभेच्छा, त्यांचा सन्मान करण्याचा हा कौतुक सोहळा सोहळा..
सन्माननीय आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते व प्राचार्य अब्दुल कादिर सर, ज्येष्ठ नगरसेवक समद खान, सय्यद वहाब, नगरसेवक असिफ सुलतान, डॉ. रिजवान, ॲड. हनीफ शेख, समीर खान, इरफान पठाण, शफी जहागीरदार यांच्या उपस्थितीत रंगला.
शहराच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा देत उद्याच्या भविष्याला विकासाची साद घालण्याची प्रार्थना करणारी पाहुण्यांच्या भाषणाने उर्जा देणाऱ्या या कार्यक्रमाने उपस्थितांना चेतना दिली.
गिर्यारोहणात दैदिप्यमान कामगिरी करणारा छोटा अपशाम, आयआयटीमधे निवड झालेला शोएब, उद्योगरत्न इरफान जहागीरदार, व्हॉलीबॉलमधे महाराष्ट्र संघात निवड होत उपकर्णधार बनलेला याह्या पठाण ही खरी उद्याचा मुस्लिम समाजाचा चेहरा असणारी पिढी....!
त्यांचं होणारं कौतुक उपस्थितांना प्रेरणा देत होता. ज्येष्ठ व्यक्तिमत्व प्राचार्य अब्दुल कादिर सर यांचा गौरव त्यांच्या विषयीची समाजात असलेल्या आपुलकीचं प्रतिक म्हणायला हवं. उद्याची पिढी सुशिक्षित व्हावी, प्रगतीकडे जावी, यातून देश घडावा...! शहराला गौरव वाटावा..! हे आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना नेहमीचं वाटतं.
महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार समितीवर नियुक्ती झाल्याबद्दल माझा झालेला गौरव आनंददायी होता. यासाठी संयोजकांच्या प्रती मनस्वी कृतज्ञता व्यक्त करतो.
जयंत येलुलकर (मा. नगरसेवक / रसिक ग्रुप, अहमदनगर)