तो प्रकाशाचा दाता आहे, ऊर्जा आहे..

आपल्या हातांनी केशरी रंगांची उधळण करीत..
सूर्य उगवतो दररोज
सोनेरी किरणांनी न्हावू घालताना..
आशा देतो नवस्वप्नांची..
उत्साह वाढवतो...
सोबत करतो..

चंदेरी किरणांनी चकाकत मध्यान्ही..
देतो एक हळुवार फुंकर..
अंधारात चाचपडताना,
घेऊन येतो आशेची तिरीप,
तो झोपडीत भेटतो..
महालात असतो...

कधी गर्द झाडीत तर कधी समुद्रावर..
प्रश्नांची उजळणी करतांना एखाद्या कट्ट्यावर..
देतो आशीर्वाद माऊलीच्या बाळाला..
तर कधी आजोबांच्या निरोप समयाला..
तो प्रकाशाचा दाता आहे,
ऊर्जा आहे..

जगण्याची आस आहे..
लाखो वर्षांचं ब्रह्मांड....!
तरी तो येतोच आहे..
कधी संघर्षाची प्रेरणा देत
प्रखर होताना, 
तर कधी मुलायम कोवळेपण घेऊन येतांना...
तो भेटतो..

सावलीशी खेळतो..
चालता चालता रंग बदलतो..
थकव्याशी कुजबुजताना जवळ असतो ...
अन् 
कडाक्याच्या थंडीला घट्ट कवटाळत पूरेपूर उब  देतो..
उद्दात्तपणे....!

- जयंत येलुलकर (अहमदनगर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !