पुणे - 'अनाथांची माय' म्हणून अवघ्या महाराष्ट्राला परिचित असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांचे पुण्यात निधन झाले. वयाच्या ७३ वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्याववर गॅलॅक्सी रुग्णालयात उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वीच त्यांची एक शस्त्रक्रिया पार पडली होती.
फोटो सौजन्य : फ्री प्रेस जर्नल |
सिंधूताई एक महिन्यापासून रुग्णालयात ऍडमिट होत्या. त्यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया पार पडली. काही दिवस त्यांनी उपचारांना प्रतिसाद दिला. मंगळवार सकाळपासून त्यांची प्रकृती खालावली होती. तर रात्री ८ वाजून दहा मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती त्यांचे निकटवर्तीय सुरेश वैराळकर यांनी दिली आहे.
१४ नोव्हेंबर इ.स. १९४७ रोजी वर्धा जिल्ह्यातील नवरगाव येथे सिंधुताई सपकाळ यांचा जन्म झाला. नको असूनही मुलगी झाली म्हणून त्यांचे नाव 'चिंधी' असे ठेवले होते. त्यांचे वडील अभिमान साठे हे जनावरांचा सांभाळ करायचे. ते मुलीलाही जनावरे सांभाळायला पाठवायचे.
परंतु, सिंधूताई गावात असलेल्या शाळेत जाऊन बसायच्या. त्यांनी जेमतेम चौथीपर्यंत शिक्षण घेतले. आयुष्यात अनेक खडतर प्रसंगांना तोंड दिले. अनाथ मुलांचा सांभाळ करायला लागल्यामुळे त्यांना अनाथांची माय म्हणून ओळखले जाऊ लागले. सन २०१२ मध्ये त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाला.
सिंधूताई यांनी अनाथ मुलांचा सांभाळ करण्यासाठी पुण्यातील हडपसरमध्ये बाल निकेतन, चिखलदरा येथे सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह, वर्धा येथे वर्धमान बाल भवन, गोपिका गाईरक्षण केंद्र, सासवडला ममता बाल सदन, तसेच सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षणसंस्था स्थापन केल्या होत्या.
नुकतेच सन २०२१ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या निधनामुळे अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाची वार्ता समजल्याने अनेकांना धक्का बसला आहे. सिंधूताई तरुणाईतही प्रचंड लोकप्रिय होत्या. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.