अशा लोकांमुळेच जग जिवंत आहे.. श्वास चालू आहे..

परवा सिंधुताई गेल्या,
काल अनिल अवचट...
समाजाला विचार, दिशा देणारी ही महान माणसे..
आपल्या जगण्यातून क्रांती करणारी,
समाज घडवणारी..
आदर्श निर्माण करणारी व्यक्तिमत्वे...!


आपल्यातून यांनी असं अचानक निघून जावं..
समाज पोरका करून..!
हल्लीचं जग संघर्षाचं, स्पर्धेचं आहे..
आपल्या शिवाय इतरांसाठी काही करावं, 
असा विचार मनात येणारी खूप कमी लोक आपल्याला सार्वजनिक जीवनात दिसत असतात..

मी, माझी पत्नी अन् मुले या शिवाय खिडकी बाहेर पहायला कुणाला वेळ नाही..
सुखाच्या व्याख्याच बदलत चालल्या आहेत.
ज्याला त्याला केवळ पैश्यात सूख दिसतंय...
म्हणून ते पळत सुटलेत,
सुखाच्या शोधात..
पण,

त्यांना हे कोण सांगणार..?
की अत्तराच्या बाटलीतील हे सुख केव्हांच गायब झालंय...!
कुणाला ताज हॉटेलमधे डिनर घेत सुखं दाखवायचं आहे तर कुणाला ओबेरॉयमधे..
बायकोचा गळा सोन्याने मढवत त्याचं प्रदर्शन करीत कुणाला सुखाचा आनंद घ्यायचा आहे... 
तर कुणाला त्या सोबत सेल्फी घेत..
सूख तुलनेवर जास्त अवलंबून झालंय...

दुसऱ्याशी तुलना करायची,
वरचढ व्हायचं..
त्यांत आपलं सूख अनुभवायचं...
जिभेवर मेथीची भाजी, भाकरी अन् फोडलेला कांदा याची चव असेल तर त्याच्या इतका आनंद कोणता नसतो.. यातही अनेकांचं सूख दडलेलं असतं..

हे सारं समजत असेलही आपल्याला..
पण आपल्या मुखात पिझ्झा नसेल तर..?
आपण जपलेलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग.. त्याचं काय ?
जग काय म्हणेल आपल्याला...
हा विचार सतावत राहणारे आम्हीं....!

आपला आनंदाचा विचार ढासळत चालला आहे की  जगण्याच्या व्याख्या बदलल्या आहेत...?
खळखळून हसण्याचे दिवस केंव्हाच मागे पडलेत ना..!
ओलावा, जिव्हाळा शोधावा लागतोय...
अंधुक होतंय सगळं...!
संवाद नाहीसा होतं चाललाय...
नाती क्षीण झालीत...!

घराजवळच्या चौकातील टीव्ही केव्हापासून अडगळीत पडलाय....
गर्दी करीत टीव्हीवर सिनेमा पाहण्याचे दिवस केव्हाच निघून गेलेत..
आता घरात चहा घेताना समोर टीव्ही हवा असतो आपल्याला.
चेनेल्सचा...!

आईच्या माहेरचं चार ओळींच पत्र घेऊन पोस्टमन घरी यायचा, 
तेव्हा आई पोस्टमन काकांना आग्रहाने चहा द्यायची..
डोळ्यांत भरलेल्या पाण्यासोबत माहेरचं पत्र वाचायची..
हल्लीच्या मोबाईल मॅसेजच्या जमान्यात ते पोस्टमन काका, ते पोस्टकार्डही हरवून गेलंय...
सगळंच कोरडं..

किनाऱ्यावर जावं.. लाटेत पाय भिजवावेत तरी कोरडेच.. तसचं काहीसं...
जॉगिंग पार्कवर बरेच ज्येष्ठ नागरिक गप्पा मारत बसलेले असतात एखाद्या कट्ट्यावर..
जसा अंधार पडू लागतो तसे घरी निघायची वेळ येते, 
तेव्हा काहीं आजोबांना थोडा वेळ आणखी बसावं वाटतं...
त्यांचं दुःख वेगळचं,

आयुष्यभर मोठ्या पदावर नोकरी केलेलीं, गाडी, नोकर चाकर दिमतीला असणारे आजोबा आता थकले आहेत... क्षीण झाले आहेत.. शरीराने, मनाने....!
घरात मुले, सूनांकडून होणारी अवहेलना निपचित सहन करीत आयुष्य जगताना हा कट्टा, इथले सोबती काहीं वेळ सूख तरी देत असतील त्यांना...
म्हणून आजोबांना आणखी काही वेळ त्यांच्यात बसायचं असतं..

इथे रक्ताची नाती विचारेनासी झाली तर बाहेरचं कुठे घेऊन बसलात..
अन् या नैतिकता, कर्तव्य विसरलेल्या काळात,
इतरांच्या सुखासाठी, आनंदासाठी आपलं जीवन वेचनारी सिंधुताई, अनिलजी सारखी व्यक्तिमत्वे कलियुगातील दीपस्तंभ म्हणावी लागतील हो.
अशा लोकांमुळेच जग जिवंत आहे..
श्वास चालू आहे..
समाजाचा हा हुंकार आहे..

सिंधुताई,
कुठे शोधायचं आता आम्ही तुम्हाला..?
होतील का या जमान्यात पुन्हा तुमच्या सारख्या माई....
अशी माणसे पुन्हा भेटतील का..?
समाजाच्या विकासासाठी राजकारण, समाजकारण करण्याचा देखावा करून त्या आड प्रचंड माया कमावणारी
ढोंगी माणसे पाहिली की,
मन विषण्ण होत जाते...

फ्रेममधे जाऊन बसलेले माई, बाबा यांचे फोटो पाहिले की,
सत्य स्वीकारावं लागतं,
हे चेहरे आता आपल्यात पुन्हा कधी येणार नाहीत...
जग अशा माणसांनी रिकामं होत चाललंय,
अन्
आपली आपल्यालाच भीती वाटू लागलीय...

- जयंत येलुलकर (अहमदनगर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !