नेवासा (जि. अहमदनगर) - जिल्ह्यात वाळूतस्करांनी पोलिसांना खुले आव्हान दिले आहे. यावर कारवाई करणे सोडाच, पण वाळू तस्करांपासून पोलिसच सुरक्षित नाहीत. एका वाळूच्या डंपरवर कारवाई करत असताना मुजोर वाहनचालकाने थेट पोलिसाला पळवून नेत त्याचे अपहरण केले. हा प्रकार घोडेगाव परिसरात घडला.
नेवासे तहसीलचे नायब तहसीलदार व त्यांच्या पथकाला घोडेगाव जवळ मांडेगव्हाण शिवारात एक अवैध उत्खनन केलेेल्या वाळूचे डंपर खाली होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार नायब तहसीलदार के. आर. सानप, तलाठी व सोनई पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
मांडेगव्हाण येथे सुदाम भगवंता सुरसे यांच्या घराच्या बांधकामासमोर अवैध उत्खनन केलेली वाळू खाली केेली होती. नायब तहसीलदार केे. आर. सानप यांनी चालकाचा जबाब नोंदवला. वाहनाचा व गौण खनिजाचा पंचनामा केला. नंतर या वाहनात पोलिस कर्मचारी सचिन भिकाजी रणदिवे यांना बसवले.
हे जप्त केेलेले डंपर (क्र. एमएच १६ एई ७८७७) चालक सचिन अशोक गांगुले याला नेवासा तहसीलमध्ये नेण्यास सांगितले. परंतु, वाहनचालकाने पोलिस आणि महसूल पथकाना अरेरावी केली. 'तुम्ही मला व माझ्या मालकाला ओळखत नाही, तुुम्हाला दाखवतोच', असे म्हणत नायब तहसीलदारांवर धावून गेला.
परंतु, पोलिसांनी त्याला समज दिल्यामुळे त्याने वाहनात बसून तेे दामटले. तेथून नगर-औरंगाबाद महामार्गावर आल्यानंतर वडाळा चौकातून त्याने अचानक यु टर्न घेतला. या चालकाने डंपर तसाच घोडेगावातून नगरच्या दिशेने वेगाने दामटला. यावेळी पोलिसाने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला.
परंतु, डंंपरचालकाने सरकारी कामात अडथळा आणत पोलिसाचेच अपहरण केले. त्याच्या ताब्यातील डंपर तसाच वेगाने नगरच्या दिशेने नेेला. पांढरी पूलजवळ इमामपूर घाटात आल्यानंतर त्याने एका निर्जन ठिकाणी रस्त्याच्या कडेला पोलिसाला खाली उतरून दिले. व भरधाव वेेगाने निघूून गेला.
तलाठी राजेंद्र रामचंद्र भुतकर (वय ४७, रा. नगर) यांनी सोनई पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डंपरचालक सचिन गांगुले व मालक विजय कराळे (रा. कापूरवाडी, ता. नगर) यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, अपहरण करणे, वाळू चोरी व सरकारी नोकरावर हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेची माहिती समजताच सोनई पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागुल घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी सोनई पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा अधिक तपास फौजदार विक्रम मिसाळ हे करीत आहेेत.