अहमदनगर - नुकत्याच भोपाळ येथे दि. ५ ते ९ जानेवारी २०२२ दरम्यान संपन्न झालेल्या पश्चिम विभागीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठाने सिल्व्हर मेडल जिंकले. नगर येथील खेळाडू सई काळे ही या संघात होती. यामुळे तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी व 'खेलो इंडिया' या दोन्ही स्पर्धेसाठी निवड झाली.
यामध्ये महाराष्ट्रासह, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, गोवा येथील ७२ महाविद्यालयीन मुलींच्या व ७८ मुलांच्या संघाच्या अशा एकूण १ हजार खेळाडूंचा सहभाग होता. मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल यांच्या हस्ते रविवारी या स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंचा करंडक व पदक देऊन सन्मान करण्यात आला.
सई काळे ही पुणे विद्यापीठाकडून खेळत आहे. ती सारडा कॉलेजमध्ये एफवायबीकॉम शिक्षण घेत आहे. त्याबरोबरीने ती चार्टर्ड अकाउंटंट ची परिक्षा सुद्धा देत आहे. या यशाबद्धल सारडा कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे यांनी तिचे अभिनंदन केले आहे.
तिला प्रा. संजय धोपावकर, प्रा. संजय साठे व मल्हार कुलकर्णी यांचे मार्गदर्शन मिळाले. चार्टर्ड अकाउंटंट राजेंद्र उर्फ ज्ञानेश्वर काळे व माजी नगरसेविका मनिषा बारस्कर - काळे यांची सई ही कन्या आहे. सईच्या यशाबद्दल वाडिया पार्क बॅडमिंटन ग्रुप, अहमदनगर क्लब बॅडमिंटन ग्रुप व नगरमधून तिचे अभिनंदन होत आहे.