अहमदनगर - 'मोक्का' लागलेल्या गुन्ह्यातील पाच आरोपींचे पलायन पोलिसांना भोवले आहे. राहुरी येथील कारागृहातून कुख्यात लुटारु सागर भांड याच्यासह पाच जणांच्या टोळीने पलायन केले होते. त्यात एका फौजदारासह पाच पोलिसांवर निलंबनाची कारवाई झाली होती. आता आणखी एका अधिकाऱ्यावर कारवाई झाली आहे.
राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आरोपींच्या पलायन प्रकरणात त्यांच्याकडून गंभीर त्रुटी झाल्याची बाब चौकशीत समोर आली होती. त्यामुळे त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव तयार केला होता.
श्रीरामपूर उपविभागाच्या अपर पोलिस अधीक्षक दीपाली काळे यांनी पलायन प्रकरणाची चौकशी केली होती. काही जणांचे जबाब त्यांनी नोंदवले होते. त्यानुसार पीआय इंगळे यांच्याबाबत काही त्रुटी समोर आल्या होत्या.
त्यांनी हा चौकशी अहवाल पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना सादर केला होता. त्यामुळे एसपी पाटील यांनी पीआय इंगळे यांना निलंबित करण्यासाठी आयजी यांची परवानगी मागितली होती. त्याला मंजुरी मिळाली आहे.
राहुरी कारागृहाच्या मागील बाजूच्या खिडकीचे गज कापून सागर भांड याच्यासह पाच आरोपींनी पलायन केले. त्यापैकी तिघा जणांना पोलिसांनी पकडले आहे. सागर भांड यालाही पोलिसांनी काही तासांतच जेरबंद केले होते. मात्र अजूनही दोन आरोपी पसारच आहेत.