माणसा-माणसांतली 'आपली माणसं' ओळखता आली..

मागील दोन वर्ष म्हणजे सर्वांच्याच तोंडचे पाणी पळवणारे वर्षं ठरली. कोरोनाचा कहर. कितीतरी जवळची माणसं काळाच्या पडद्याआड झाली. ही दुखरी नस आयुष्यभर ठसठसत राहणार, हे निश्चित. एक चांगलं झालं माणसा-माणसातील आपली माणसं ओळखता आली.

    
कोण मनाने आपलं आहे, हे या दोन वर्षांनी खरच सर्वांनाच दाखवून दिले. अजूनही कोरोना गेलेला नाही. त्याची टांगती तलवार आपल्या डोक्यावर आहेच. त्यामुळं आपण सर्वजण योग्य ती काळजी घेणारच आहोत. आणि आता तर ती कायमसाठी घ्यावी, असं मी म्हणेन..!

चिमुकली घरात बसून कंटाळून त्यांनीही ती परिस्थिती स्विकारली आहे. तडजोड करण्यापेक्षा स्विकारणं महत्त्वाचे नाही का..!

काही माणसं जिवाभावाची झाली या आभासी जगात. न भेटताही मैत्र जपून हृदयात विराजमान झाली.. म्हणून या सरत्या वर्षाचे आभार...!

आता नववर्ष नेहमीप्रमाणेच वेगवेगळे संकल्प होतील (कधी न पूर्ण केलेले..) पण व्हॉटसअपच्या माध्यमातून सकारात्मकतेचे दिवे लावणारी माणसं आहेत. त्यांचेही आभार.

अशीच मनामनाची सोबत करत पुढे जाऊ. आपला प्रवास सर्वांच्याच साथीने करत राहू. विचारांचे दिवे आता विझू द्यायचे नाहीत, असं स्वतःच्या मनाला बजावत दुसऱ्यांच्या मनात हे दिवे तेवत ठेवू..

कारण ही जगण्याची आस सा-यांच्या मनात सतत जागती राहू दे. मी. माझं. यापेक्षा आपण, आपलं.. हे जपत राहूया. मोकळ्या मनानं इतरांच्या पाठीवर कौतुकाचे दोन शब्द लिहू..

हे दोन शब्द लिहल्याने तुमचा शब्दकोश नक्कीच रिता होणार नाही. शब्द असे दुसऱ्यांसाठी सांडल्यावर अपूर्व समाधान मिळतं ते नक्कीच अनुभवा. सन २०२२ च्या अंतरंगात पाऊल ठेवताना एक व्रत नक्कीच पाळूया. 

जात, धर्म, पक्ष, पैशाचा माज, दुसऱ्यांच्या व्यंगावर, बायकांवर फालतु जोक्स करणे, मनातली उदासी, स्वभावातील हेकटपणा, खळबळ हे सारं ३१ च्या कपाटात ठेवून कुलूप लावून किल्ली देऊया फेकून. होय नं..?

असुया, इर्षा, द्वेष, कुशंका, मत्सर या साऱ्या हीन चपला बाहेरच काढून ठेवूया, अन मोकळ्या प्रांजळ मनाने प्रवेश करुया २०२२ च्या प्रासादात. तुमचं नक्कीच स्वागत होईल. चला एकमेकींच्या साथीने जाऊ २०२२ च्या सुर्यकिरणांनी सजलेल्या आशादायी प्रासादात.!

- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !