सातारा - सोशल मिडियावर राजकीय मत व्यक्त केल्यामुळे आपल्यााला मालिकेतून काढून टाकले, असे सांगणाऱ्या प्रसिद्ध अभिनेता किरण माने यांच्या प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. एकीकडे किरण माने यांना सोशल मिडियासह सर्व स्तरातून सहानुभूती मिळत असताना आता एक वेगळी माहिती समोर येत आहे.
एका खासगी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या मालिकेत किरण माने प्रमुख व्यक्तीरेखा साकारत आहेत. त्यांच्यासोबत काही नवे आणि जुने कलाकारही या मालिकेत काम करत आहेत. सध्या सातारा येथे या मालिकेचे शुटिंग सुरू आहे. ही मालिका छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या चांगली पसंतीला देखील उतरलेली आहे.
तीन दिवसांपूर्वी किरण माने यांनी स्वत:च्या सोशल मिडिया प्रोफाईलवर 'आपण फेसबुकवर राजकीय मत व्यक्त करत असल्यामुळे आपल्यााला मालिकेतून काढून टाकले' अशी माहिती दिली. अन् एकच गदारोळ उडाला. या मालिकेच्या प्रेक्षकांसह अनेकांनी त्यांना समर्थन देत मालिकेवर बंदी घालण्याचे आवाहन केले.
या मालिकेचे शुटिंग जेेथे सुरू आहे, त्या ग्रामपंचायतीने देखील शुटिंग करण्यास मनाई केली. परंतु, एका मराठी वृत्तवाहिनीच्या स्थानिक प्रतिनिधीने शुटिंगच्या घटनास्थळी जाऊन इतर कलाकारांची प्रतिक्रिया जाणून घेतली. यावेळी मात्र वेगळीच माहिती समोर आली आहे. तसेच शुटिंग बंद पडलेले नाही, हेही समोर आले.
किरण माने सेटवर सहकलाकारांना टाँटिंग करतात, म्हणून प्रॉडक्शन हाऊसकडे त्यांच्या अनेक तक्रारी गेल्या होत्या. त्यामुळे त्यांना वारंवार समजही दिली होती. परंतु, त्यांच्या वर्तणुकीत बदल झाला नाही. म्हणून प्रॉडक्शन हाऊसने त्यांच्यावर ही कारवाई केली, अशी माहिती सहकलाकारांनी यावेळी दिली.
दरम्यान, अभिनेता किरण माने यांनी याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांची भेट घेऊन त्यांनाही याबाबत माहिती दिली आहे. परंतु, 'पवार साहेब आमचेही आदरणीय आहेत. ते फक्त एक बाजू ऐकून कोणतीही प्रतिक्रिया देणार नाहीत', असे सहकलाकार वृत्तवाहिनीशी बाेलताना म्हणाले.
एकीकडे किरण माने प्रकरणामुळे कलाकरांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असल्याची, त्यांना कामावरून काढले जात असल्याची बाब पुन्हा समोर आल्यामुळे अनेकांनी त्यांना पाठिंबा व्यक्त केला आहे. सोशल मिडियावर 'आय सपोर्ट किरण माने' अशी मोहिम सुरू झाली आहे.
तर दुसरीकडे मालिकेतील सहकलाकारांनी मात्र, त्यांच्या वर्तणुकीवर आक्षेप घेतले आहेत. त्यामुळे हे प्रकरण तुर्तास तरी थांंबणार नाही, हे निश्चित.