अहमदनगर - ओमायक्रॉन आणि काेविडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नगर कोर्टात 'ई फायलिंग' सुरु करण्याचा आदेश आलेला आहे. त्यानुसार जिल्हा व सत्र न्यायालयात आता १ जानेवारीपासून ई फायलिंग सुविधा सुरु झाली आहे. प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी ही माहिती दिली.
जिल्हा न्यायालयातील शहर वकिल संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांतर्फे वर्षाच्या पहिल्याच दिवशी नव्या वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्या हस्ते या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश मिलिंद कुर्तडीकर, जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, वकील संघाचे अध्यक्ष ऍड. अनिल सरोदे, उपाध्यक्ष ऍड. संदीप वांढेकर, सचिव ऍड. स्वाती नगरकर, खजिनदार ऍड. अविनाश बुधवंत आदींसह पदाधिकारी व वकील उपस्थित होते.
ऍड. सरोदे म्हणाले, वकिलांना दिवसाचे नियोजन ठरविताना कामकाज सुटसुटीत होण्यासाठी उच्च न्यायालयाने जाहीर केलेल्या सर्व सुट्या व स्थानिक सुट्या या दिनदर्शिकेत अधोरेखित केल्या आहेत. नव्या वर्षाची सुरूवात चांगली व्हावी, यासाठी पहिल्याच दिवशी नव्या वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन केले.
आता जिल्हा न्यायालयात नव्याने 'पे अँड पार्किंग' सुविधा सुरू होत आहे. वकिलांना यामध्ये सवलत मिळावी, यासाठी शहर वकील संघाच्या वतीने सर्व वकिलांना अल्पदरात वार्षिक पास दिले जाणार आहेत. यावेळी ऍड. शाम असावा यांची शासनाच्या लोकआयुक्त समितीवर निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
जिल्हा न्यायाधीश एम. व्ही. पाटील, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ए. पी. कुलकर्णी, दिवाणी न्यायाधीश आर. डी. चव्हाण, मुख्य न्यायदंडाधिकारी वाय. ए. तिवारी या न्यायाधीशांना पदोन्नती मिळाल्याबद्दल वकील संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष ऍड. संदिप वांढेकर यांनी केले. तर सूत्रसंचालन ऍड. स्वाती नगरकर यांनी केले. अविनाश बुधवंत यांनी आभार मानले. तर सदस्य ऍड. सागर जाधव, विक्रम शिंदे, सोनाली कचरे आणि कार्यकारिणी सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.