मनाेरंजन - अहमदनगरच्या नाट्य क्षेत्रात जिप्सी प्रतिष्ठान अग्रेसर आहे. जिप्सी स्टुडिओ येथे जेष्ठ नाट्यकर्मी श्रेणीक शिंगावी यांच्या हस्ते नटराज पूजन करून नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. यावेळी अध्यक्ष शशिकांत नजान, अभिनेते अनंत रिसे, युवा दिग्दर्शक स्वप्नील नजान, तंत्रज्ञ प्रथमेश बर्डे, उपस्थित होते.
गेली २५ वर्षापेक्षा जास्त काळापासून जिप्सी प्रतिष्ठानच्या वतीने नटराज पूजन करून नवीन वर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे. ज्या नाट्यकट्ट्यावर नाटक सुचते, अनेक कलाकृतींचा जन्म ज्या ठिकाणी होतो, नाट्यकर्मींच्या कल्पना मूर्त रूप धारण करतात, त्या कट्ट्यावर साधेपणाने नटराज पूजन केले जाते.
कोणताही सत्कार समारंभ न करता होणारे नटराज पूजन नगरच्या नाट्य क्षेत्रातील एक अविभाज्य घटक झाले आहे, अशी माहिती शशिकांत नजान यांनी यावेळी दिली. श्रेणीक शिंगावी म्हणाले, जिप्सी प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक कलाकार तंत्रज्ञ तयार झाले व घडले.
त्यांना नाट्य-चित्रपटात क्षेत्रात मोठी संधी निर्माण झाली. तंत्रशुद्ध कलाकार आणि तंत्रज्ञ घडवणे, याचबरोबर नगरच्या सांस्कृतिक क्षेत्रात विविध प्रयोग करणे हे महत्वाचे कार्य या संस्थेमार्फत होत आहे. नाटकाबरोबर नवीन तंत्राचा स्वीकार करत वेबसिरीज क्षेत्रात जिप्सी फिल्म्स उतरत आहे.
नवोदित आणि जेष्ठ कलाकारांना सोबत घेऊन जिप्सी प्रतिष्ठान आता प्रभावी निर्मिती करीत आहे. भविष्यात चित्रपट क्षेत्रात नगरला मोठे स्थान निर्माण करण्याचे प्रयत्न ही संस्था करते आहे, असे अनंत रिसे यांनी यावेळी संगितले.
जिप्सी प्रतिष्ठान आणि फिल्म्सच्या आगामी उपक्रमांची स्वप्नील नजान यांनी माहिती दिली व आभार मानले. सूत्रसंचालन गौरी नजान यांनी केले. यावेळी आकाश तोडमल, सचिन क्षीरसागर, चाणक्य नेहुल, प्रेरणा मुळे, पूजा कानडे, प्रीतम गायकवाड, हर्षल वालेकर उपस्थित होते.