अनिरुध्द तिडके (अहमदनगर) - फिनिक्सच्या माध्यमातून जालिंदर बोरुडे यांची दीनदुबळ्यांची सेवा सुरु आहे. त्यांची निस्वार्थ, अविरत रुग्णसेवा दखलपात्र असून, छोट्याश्या गावात मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेऊन लाखो दुर्बल घटकांना नवदृष्टी देण्याचे काम त्यांनी केले.
कोरोना काळातही न घाबरता त्यांनी दाखवलेले धाडस व गरजू घटकांना पुरवलेली आरोग्यसेवा प्रेरणादायी आहे. वंचितांच्या आरोग्यसेवेसाठी सदैव तत्पर असणारे जालिंदर बोरुडे हे शहराचे भूषण असल्याचे प्रतिपादन आमदार अरुणकाका जगताप यांनी केले.
या कार्याची लवकरच जागतिक पातळीवर नोंद होणार असल्याची आशा व्यक्त केली. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय अंधत्व निवारण समितीच्या वतीने नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार जगताप यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, सरचिटणीस लवेश गोंधळे, नवनाथ महाराज फरकाळे, संजय सत्रे उपस्थित होते. माणिक विधाते म्हणाले, सर्वसामान्य घटकातील ज्येष्ठ नागरिकांना दृष्टी देण्याचे कार्य जालिंदर बोरुडे करत आहेत.
महाराष्ट्रासह दिल्लीतही त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली असून, ही नगरकरांच्या वतीने भूषणावह बाब आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक मोफत शिबिरे घेऊन त्यांनी वंचितांना मदतीचा हात दिल्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना जालिंदर बोरुडे यांनी निस्वार्थ भावनेने फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने कार्य सुरु आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून नेत्रदान चळवळीतही कार्य सुरु आहे. फाऊंडेशनच्या आवहानाला प्रतिसाद देत होत असलेले नेत्रदान हे पुरस्कारापेक्षाही मोठे असल्याचे सांगितले.