मराठी भाषेचे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी पहिले मराठी वृत्तपत्र सुरु केले होते. आणि जांभेकर यांचा जन्मदिनही ६ जानेवारी. म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र शासनाने ६ जानेवारी हा दिवस 'पत्रकार दिन' म्हणून घोषित केला आहे.
गोविंद कुंटे आणि भाऊ महाजन यांच्या मदतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले. हे काम काही सोपे नव्हते अनंत अडचणींना त्यांना तोंड द्यावे लागले. तरीही त्यांनी पत्रकारिता जिवंत ठेवली.
इंग्रजी सत्ताधाऱ्यांना स्थानिक लोकांच्या अडचणी आणि भावना कळाव्यात म्हणून 'दर्पण'मध्ये एक स्तंभ लिहिला जात असे. खरंतर वृत्तपत्राची कल्पना त्यावेळी जनमानसांत रुजली नव्हती.
त्यामुळे तोट्यात जाऊन, पदरमोड करुन हे वृत्तपत्रं काढले जात असे. पण तरीही ते जनमानसांत रुजले. त्याकाळी अशा वृत्तपत्रे चालविणाऱ्या संपादकांमध्ये बाळशास्त्री जांभेकर हे अग्रणी होते. हे वृत्तपत्र १८४० पर्यंत चालले.
काही अपवाद वगळता आता पत्रकारिता ही 'ठराविक लोकांच्या हितसबंधा'साठी काम करते. किंवा 'केवळ माहिती संकलना'चे काम करते. घडलेल्या घटनांचे 'अन्वयार्थ' लावण्यात मराठी पत्रकारिता कमी पडत आहे.
पूर्वी 'सत्य समाजासमोर आणणे' हे पत्रकारांचे काम होते. पण ही निस्पृहता आता कमी झाली आहे. वाचण्यापेक्षा पहाणे लोकांना आवडू लागल्यामुळे स्पर्धेत टिकण्यासाठी वृत्तपत्रांचा दर्जाही घसरु लागला आहे.
आताची पत्रकारिता मालकाच्या लहरीवर, आज्ञेवर नाईलाजाने का होईना, म्हणून चालवावे लागते. आपण विश्वासार्हता गमावत चाललेलो आहोत.
सरकारला न दुखावणे, आर्थिक महसूल मिळविणे, हीच आणि अशीच वाटचाल चालू राहिली तर पत्रकारितेचे भविष्य फार चिंताजनक आहे.. खरी पत्रकारिताच शिल्लक राहणार नाही. उरेल ती फक्त 'पत्रक'कारिता.
'कालाय तस्मैं नमः' असं म्हणत, पहात बसावं लागेल, अशी भिती एक पत्रकार म्हणून मला वाटत राहाते. तसेच आपली भूमिका ठामपणे ठेवण्यासाठी किंमत मोजायची तयारी पत्रकाराने ठेवायला हवी, हेही खरं.!
माझ्या पत्रकारबंधू आणि भगिनींना मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा..! पण 'कुणाला गोड वाटावं म्हणूनच 'बरं' लिहिण्यापेक्षा, सत्य जगासमोर आणण्यासाठी 'खरं' लिहुया..!
सत्यमेव जयते...!!
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर),
(संपादक - सखीसंपदा)