आज संक्रात. म्हणजे काय..?
तर नारायणाचं दक्षिणायन संपन्न.
अन उत्तरायणाचा आरंभ...
मकर संक्रमण..!
अन उत्तरायणाचा आरंभ...
मकर संक्रमण..!
आपलं शास्त्र सांगतं, सुर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून 'मकर संक्रात'. मग उत्तरायणाचा प्रारंभ होतो. पण आपल्या आयुष्यातही संक्रमण व्हावं 'दुःखांचे.. जाती जातीतील द्वेषाचे'. तिळाच्या स्निग्धतेसारखं आपलं मन स्निग्ध व्हावं. पण एवढं मात्र नक्कीच मनात येतं की...
छोट्या छोट्या गोष्टींसाठी दुःखी होणारे आपणासं गुळाची उर्जा मिळून हल्ली जात धर्म यांच्या संकल्पना तीव्र होताना दिसत आहेत. सोशल मिडिया सबंधाना गिळतानाचा राक्षस होऊ पहातो आहे. माणसातलं अविवेकपण सतत समोर येत आहे.
आपल्या सारख्या सुजाण व्यक्तिंनी याला थांबविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हा खारीचा वाटा उचलता उचलता माणुसकीचा सुरेख साकव उभा राहिला तर नवल नको. मागच्या पिढीची धरोधर पुढे नेताना आपल्यातील चांगुलपणाची भर घालत ते पुढच्या पिढीपर्यंत पोहचवावे.
जीवाला चिकटलेला घोर आणि दुःखं. यांचं संक्रमण व्हावं. कायमचं.! माणसामाणसात संवाद व्हावे. अन मनातल्या आशा-आकांक्षांच्या पतंगांना, मनमोहक रंग चढावेत, अन विहरावेत ते निळ्याशार आकाशी..
हे सगळं नशिबाने घडलंय. असंही असू नये. पतंग कितीही काचला आणि बोचला.. तरी या विहरत्या स्वप्न-पतंगांचा दोर मात्र नियतीने आपल्याच हातात ठेवावा.
आणि हो दुसऱ्यांचा पतंग काटण्याची इर्षा कधीच जन्मायला नको ना आपल्या मनात. आपलं मन त्या आकाशासारखं निरभ्र व्हावं. या संक्रमणाच्या सर्वांना सदिच्छा. आमेन...!
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)