चलना तो है ! किसीके साथ भी, किसीके बगैर भी..

बरेचदा इतर नाती निभावताना, किंवा त्या नात्यासोबत जगताना, आपण एक नातं विसरत जातो, किंवा मागे सोडत जातो. ते म्हणजे स्वतःचं, स्वतःशी असलेल नातं. आयुष्यात अनेक वळणांवर अनेक हात सुटतात, अनेक नवीन हात हातात येतात.


पण हा हात सुटण्यापासून परत नवीन हात हातात येईपर्यंतचा प्रवास हा अंत्यत वेदनादायक आणि एक अनामिक रितेपण देणारा असतो. त्यावेळी मनाची प्रचंड मोडतोड होते, स्वतःला लेखलं जातं, स्वतःचाच राग राग केला जातो. आणि अनेक पातळ्यांवर अनेक गोष्टी विस्कटत जातात. सुटत जातात. 

हे सगळं का घडतं, तर आपण एखाद्याचं असणं, किंवा एखाद्या नात्याचं आपल्या आयुष्यात असणं हे कायमचं असेल, असं गृहीत धरलेलं असतं. पण प्रत्येक नातं किंवा माणूस आयुष्याभर सोबत करेलच असं नसतं.

पण आपण स्थायीभाव गृहीतच धरलेला असतो आणि तिथेच सगळं बिनसत जातं. मग नातंच जोडायचं नाही का..? किंवा माणसंच नकोच का आयुष्यात..? तर तसं नाही. तर त्यांचं असणं किंवा त्यांची सोबत गृहीत धरायची नाही.

सुखाचे, आनंदाचे, उर्जेचे आणि उर्मी देणारे क्षण असतील, तर मनात साठवायचे. पण ते क्षण कायमच मिळतच राहतील, ही अपेक्षा किंवा मिळलेच पाहिजेत, हा अट्टाहास नसावा. ह्यासाठी स्वतःजवळ स्वतःचं नातं घट्ट हवं, ते समजलेलं हवं.

म्हणजे मग अशी निसटलेली नाती, माणसं, ह्यांचा मन स्वीकार करतं.. आणि  चांगल्या आठवणींसहित मन प्रवाही राहातं. हेच नातं आपल्याला एक तटस्थता आणि नात्यांची समज देतं. आणि निरोप अधिक मोकळे आणि समजूदार होत जातात. स्वतःला कोणताही त्रास न देता, स्वतःच्या नजरेतून न उतरता.

मुझे चलना तो है, 
किसीके साथ भी,
किसीके बगैर भी.
मेरी मंझिल तो तू है 'जिंदगी'

बस इतकंच..!!

- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !