'जेंटलमेंस गेम' नावाने ओळखल्या जाणाऱ्या खेळातील बलाढ्य खेळाडूंना पराभूत करण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवू शकेल, असा संघ बनण्याचा प्रवास, म्हणजेच कबीर खानचा ‘८३’ हा चित्रपट. कर्णधार कपिल देव यांनी सन १९८३ मध्ये भारताला पहिला विश्वचषक विजेतेपद मिळवून दिले.
यावेळी 'अंडरडॉग्ज' म्हणून पाहिलेल्या भारताच्या संघाचे नेतृत्व कपिल देव यांनी केले होते. कबीर खानच्या '८३' मध्ये या भारतीय संघाचा प्रवास दाखवलेला आहे. ज्याने देशाला विश्वास ठेवायला आणि विश्वासाच्या बळावर जिंकता येतं हा आत्मविश्वास निर्माण करायला शिकवले.
चित्रपटातील पहिली काही मिनिटे, कबीर खान चित्रपटातील पात्रांशी ओळख करून देण्यासाठी बुद्धिमानपणे तयार केलेला पासपोर्ट क्रम वापरतो. तुम्हाला त्यावेळची वस्तुस्थिती सांगण्यासाठी तो संवाद आणि हलक्याफुलक्या संभाषणांचा वापर करतो. तेव्हा भारतीयांनाच आपण विश्वचषक जिंकू याचा आत्मविश्वास नव्हता.
मग लक्षात येते की हा चित्रपट जागतिक स्तरावर फक्त एक क्रिकेट स्पर्धा जिंकण्यासाठी नाही, तर तो आपला हरवलेला सन्मान मिळवण्यासाठी आहे. सिनेमाचं कौतुक यासाठी की चित्रपटाच्या प्रत्येक टप्प्यावर, कबीरने खऱ्या दृश्यांसोबत सिनेमातील इमेजेस जोडल्या आहेत.
या कौशल्यामुळे चित्रपटातील दृश्ये मैदानावरील वास्तविक घटनांप्रमाणेच छान दिसतात. मग आपल्या लक्षात येतं की हा फक्त चित्रपट किंवा खेळ नव्हता. तर या दोन्ही गोष्टी एकत्र करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आणि मोठ्या प्रमाणात, कबीर खान यामध्ये यशस्वी झाले आहेत.
वास्तवात एका सामन्यात भारतीय कर्णधार कपिल देव यांनी मुंगूस बॅटने इतिहास रचला. पण दुर्दैवं असं की ती दिग्गज खेळी कॅमेऱ्यात रेकॉर्ड नाहीय. ही खेळी या चित्रपटात पाहणं म्हणजे पैसे वसूल, असंच आहे. कारण कपिलच्या याच खेळीने भारताच्या स्पर्धेतील आशा पल्लवित केल्या होत्या.
पण तरीही विश्वचषक जिंकण्याचा कर्णधाराचा हेतू कोणीही गांभीर्याने घेतला नाही, ही वस्तुस्थिती चित्रपटातील वेगवेगळ्या बिंदूंवर दिसून येते. जी शेवटी संघाला सर्वोत्तम पाऊल पुढे टाकण्यास प्रवृत्त करते. अर्थात जेव्हा चषक जिंकला तेव्हा त्याला सर्वांनी डोक्यावर घेतले.
छोटे-छोटे सुख, दु:ख, शानदार विजय, वेदनादायक पराभव, प्रत्येक खेळाडूने अनुभवलेली अंतर्गत उलथापालथ, त्यांचा वैयक्तिक प्रवास आणि सज्जनांच्या खेळातील बलाढ्य पुरुषांना पराभूत करण्यासाठी स्वत:वर विश्वास ठेवू शकेल, असा संघ बनण्याचा प्रवास, हेच कबीर खानच्या '८३'चे सार आहे.
रणवीर सिंगने कपिल 'देव' साकारण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्याची नखं कुतरडण्याची, गोलंदाजीची, नटराज शॉट अचूकपणे मारण्याची शैली रणवीरणे सेम टू सेम वठवली आहे. कपिल देव यांनी विश्वचषक जिंकल्याचे चित्र आपण सर्वांनी पाहिले आहे. त्यातल्या वेगळेपणाचे नेमके कारण या चित्रपटात आहे.
हा सिनेमा खऱ्या घटनेवर आधारित असल्याने सिनेमॅटिक लिबर्टी घेण्यात काहीही वाव नव्हता. पण ज्या घटकाशी भारतीय म्हणून आपण सर्वजण संबंधित आहोत, विशेषत: खेळाच्या संदर्भात ८३. तर त्यामध्ये कबीर खान निश्चितच यशस्वी झालाय असं मला वाटतं.
- अनिरुद्ध तिडके (अहमदनगर)