अहमदनगर - माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे याचा अटकपुर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. तो विवाहित महिलेवर बलात्कार करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या व अॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात फरार आहे. जिल्हा न्यायाधीश अमित शेटे यांनी तो फेटाळला आहे.
गोविंद मोकाटे याच्या विरोधात बोल्हेगाव उपनगरात राहणार्या विवाहित युवतीने फिर्याद दिलेली आहे. तिने तोफखाना पोलिस ठाण्यात एक महिन्यापूर्वी फिर्याद दिली. गोविंद मोकाटे याने चाकूच्या धाकाने आपल्यावर वारंवार बलात्कार केला, बदनामी करण्याची व जीवे मारण्याची धमकी दिली, असे तिने म्हटले आहे.
हा गुन्हा दाखल होताच गोविंद मोकाटे फरार झाला आहे. त्याने जिल्हा न्यायालयात अटकपुर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्यावर जिल्हा न्यायाधीश अमित शेटे यांच्या न्यायालयासमोर सुनावणी झाली. अतिरिक्त सरकारी वकील मंगेश दिवाणे यांनी या अर्जाला विरोधक केला.
ऍड. दिवाणे युक्तीवाद करताना म्हणाले, गोविंद मोकाटे याच्याविरूद्ध पीडित महिलेने तांत्रिक पुरावे तोफखाना पोलिसांना दिले आहेत. त्यात काही व्हिडिओ चित्रीकरणही आहे. त्यामुळे पोलिसांकडे या गुन्ह्याचे पुरावे आहेत. या गुन्ह्यात महिला अत्याचार व ऍट्रोसिटीची कलमे लावलेली आहेत.
गोविंद मोकाटे याला जामीन देऊ नये, या गुन्ह्याची सखोल चौकशी व तपास होणे गरजेचे आहे, असा युक्तीवाद सरकार पक्षातर्फे बाजू मांडताना अतिरिक्त सरकारी वकील मंगेश दिवाणे यांनी केला. त्यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने गोविंद मोकाटे याचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
काही दिवसांपूर्वीच या गुन्ह्याचे तपासी अधिकारी बदलण्यात आले आहेत. एट्रोसिटी कलम लागल्यामुळे या गुन्ह्याचा तपास नगर शहर उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे यांच्याकडे होता. परंतु, पोलिस अधीक्षकांनी त्यांच्याकडून हा तपास नगर ग्रामीणचे उपअधीक्षक अजित पाटील यांना दिला आहे.
गोविंद मोकाटे गावातच ? - या घटनेतील पीडित महिलेने पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना लेखी निवेदन दिले आहे. त्यात तिने फरार गोविंद मोकाटे इमामपूर गावातच असल्याचे म्हटले आहे. त्याचे एका राजकीय नेत्यासोबतचे छायाचित्र तिने पोलिस अधीक्षकांना सादर केले आहे.
गोविंद मोकाटे याला राजकीय वरदहस्त असल्याचे तिचे म्हणणे आहे. त्यामुळे आपल्या जीवाला धोका असून पोलिसांनी गोविंद मोकाटे याला लवकरात लवकर अटक करावी, अशी विनंती पीडित महिलेने केली आहे. पोलिस याद़ष्टीने तपास करीत आहेत.