MBP Live24 - थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना आपण स्त्री शिक्षणाचे प्रणेते म्हणून ओळखतो. त्यांच्यामुळेच महिलांना शिक्षणाची दारे खुली झाली. परंतु, त्यांच्या या कार्यात आणखी एका महिलेचा देखील मोठा वाटा होता. या महिलेला गुगलने 'डुडल'द्वारे (Google Doodle) आदरांजली अर्पण केली आहे.
फातिमा शेख असे त्यांंचे नाव आहे. त्या मियां उस्मान शेख यांच्या बहीण होत्या. यांच्या घरी ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी वास्तव्य केले होते. आधुनिक भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिकांपैकी एक म्हणून फातिमा शेख यांना ओळखले जाते.
फातिमा शेख यांनी महात्मा फुले यांच्या शाळेत मागासवर्गीय मुलांना शिक्षण देण्यास सुरुवात केली. फातिमा शेख यांच्यासह ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी मागासवर्गीय समाजात शिक्षणाचा प्रसार करण्याची जबाबदारी घेतली होती.
सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांची पहिली भेट अमेरिकन मिशनरी सिंथिया फरार यांनी चालवल्या जाणार्या शिक्षक प्रशिक्षण संस्थेत झाली होती. दाेघीही तेथे शिक्षण घेत होत्या. नंतर महात्मा ज्योतीबा फुले यांनी स्थापन केलेल्या पाचही शाळांमध्ये त्यांनी ज्ञानदानाचे कार्य केले.
फातिमा शेख यांनी सर्व धर्म आणि जातीच्या मुलांना शिकवले. सन १८५१ मध्ये शेख यांनी मुंबईत दोन शाळांच्या स्थापनेत भाग घेतला. म्हणूनच त्यांचे कार्यही तितकेच मोलाचे ठरते. फातिमा शेख यांच्या या कार्याला सलाम करण्यासाठी गुगले आपल्या डुडलद्वारे त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.
काय आहे गुगल डुडल - गुगल सर्च इंजिनच्या होमपेजवर गेल्यानंतर गुगलचे नाव ठळक अक्षरात दिसते. अनेकदा या अक्षराऐवजी गुगलच्या नावाचा समावेश असलेले चित्र किंवा लोगो असतो. त्यातून ठळक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला असतो. तसेच महान व्यक्तींना आदरांजली अर्पण केलेली असते.