कोल्हापूर - सावित्रीआई फुले यांच्या जयंतीनिमित्त सखी संपदा मंचने आगळावेगळा उपक्रम राबवला. शेताच्या बांधावर जाऊन ऊसतोड महिला कामगारांना प्रेमाची भेट देण्यात आली. आपुलकीने मिळालेल्या या भेटीने पालावरच्या महिलाही भावनिक झाल्या.
यावेळी सखी संपदा मंचच्या कार्याध्यक्षा शुभांगी थोरात, कार्यवाह वेदिका शिंदे-देशमुख यांच्या हस्ते देखील मायेची भेट देण्यात आली. यावेळी सदस्या डॉ. विद्या साळोखे, कविता साळोखे, अनिता दळवी, शिल्पा कुलकर्णी, प्रभा जाधव, उपस्थित होत्या.
'सखी संपदा मंच'च्या वतीने अध्यक्षा स्वप्नजाराजे घाटगे यांच्या हस्ते बाचणी येथे उसतोड कामगारांच्या महिला भगिनींना प्रेमाने साडी देण्यात आली. तसेच पालावर एक सतरा दिवसांची बाळंतीण होती. तिला साडी आणि तिच्या नवजात बाळाला कपडे भेट देण्यात आले.
सखी संपदा मंचच्या वतीने कोल्हापुर परिसरातील वेगवेगळ्या पालावर जाऊन ऊसतोड कामगारांच्या महिला भगिनींना सुमारे १०० साड्यांचे वाटप करण्यात आले. या आपुलकीच्या भेटीने या महिला हरखून गेल्या. त्यांनी सखी संपदा मंचचे आभार मानले.