नाशिक - राज्यात एकीकडे दिवसेंदिवस चोऱ्या घरफोड्यांची संख्या वाढत आहे. पोलिसांनी कितीही गस्त वाढवली, अन् नागरिकांनी कितीही सुरक्षाविषयक काळजी घेतली तरी, मौल्यवान मुद्देमाल चोरीला जाण्याचे प्रमाण थांबत नाही. अशा परिस्थितीत नाशिकमध्ये मात्र एक आगळीवेगळी चोरीची घटना झाली आहे.
एका चोराने गरजेपोटी एका घरातून दागिने व रोकड चोरली खरी, पण नंतर त्याची सद्सद्विवेकबुद्धी जागी झाली. अन् त्या चोराने नंतर जे काही केले, ते पाहून नाशिकचे पाेलिसही आश्चर्यचकित झाले आहेत. ही चोरी कुठे झाली, अन् या चोराने नेमके काय केले, ते जाणून घेऊयात..
ही आगळीवेगळी चोरीची घटना जेलरोडजवळील विठ्ठलनगर येथील शरद साळवे यांच्या घरात घडली. एका चोराने त्यांच्या घरात घुसून तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरले. त्याने ज्या पिशवीमध्ये दागिने ठेवलेले होते, ती पिशवीच चोरून नेली. या पिशवीमध्ये काही राेख रक्कम देखील होती.
चोरीची घटना लक्षात आल्यानंतर साळवे यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यांनी पोलिसांकडे आपल्या घरात चोरी झाल्याची तक्रार दिली. त्यामुळे पोलिस पंचनामा करण्यासाठी साळवे यांच्या घरी आले. त्यांनी चोरटे कोठून आले, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. कारण घराचे कुलूप व कडीकोयंडा शाबूत होता.
यानंतर पोलिसांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण चोराने साळवे यांच्या घराचे कडी-कुलूपाला हात न लावता घरात प्रवेश केला होता. हा चोर थेट छतावरून घरात उतरला. त्याने घरातील सामानाची उचकापाचक करून दागिने व राेकड ठेवलेली पिशवी घेऊन पलायन केले. कारण त्याचा हेतू साध्य झाला होता.
मात्र, नंतर या चोराला काय झाले कुणास ठावूक.. त्याने पुन्हा चोरून नेलेली पिशवी साळवे यांच्या छतावर आणून टाकली. ही पिशवी पोलिसांच्या तपासणीत आढळून आली. पिशवी उघडून पाहिली तर त्यातले सगळे दागिने व रोख रक्कम देखील तशीच होती. चोरीला काहीच गेलेे नव्हते. हा प्रकार विचित्रच होता.
या पिशवीमध्ये पोलिसांना एक चिठ्ठी आढळली. त्यात चोराने साळवे यांच्या नावाने एक संदेश लिहून ठेवला होता. त्याने म्हटले होते की, 'आपण याच गल्लीत राहतो. आपल्याला पैशांची गरज होती म्हणून ही चोरी केली. पण मला माफ करा', असे म्हणत त्याने साळवे यांची माफीसुद्धा मागितली आहे.
या आगळ्यावेगळ्या घटनेमुळे साळवे आणि पोलिस चक्रावून गेले आहेत. चोरी केल्यानंतर चोरीचा मुद्देमाल परत आणून देण्याची ही कदाचित पहिलीच घटना असावी. परंतु, तरीही नाशिक पोलिस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. नाशिकमध्ये मात्र, या घटनेची चांगलीच चर्चा होत आहे.