ज्येष्ठ पत्रकार निशांत दातीर यांना ‘दर्पण पुरस्कार’ जाहीर

फलटण - मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ राज्य पातळीवरील ‘दर्पण’ पुरस्कार नगरमधील पत्रकार निशांत वसंत दातीर यांना जाहीर झाला आहे. उत्तर महाराष्ट्र विभागातून त्यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.


तब्बल बावीस वर्षे विविध वृत्तपत्र पत्रातून शहर प्रतिनिधी ते आवृत्ती प्रमुख या पदावर त्यांनी काम पाहिले आहे. निशांत दिवाळी अंक, साप्ताहिक संत नगर टाइम्स, लोकअंकुर मध्ये संपादक म्हणून सध्या काम पाहत आहेत.

कोपर्डी येथील घटनेच्या वार्तांकनाच्या वृत्तमालिकेच्या लिखाणाबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण कोल्हापूर येथील ज्येष्ठ पत्रकार व दैनिक लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीचे संपादक वसंत भोसले यांच्या हस्ते होणार आहे.

संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण समारंभ पोंभुर्ले, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग येथे संस्थेने उभारलेल्या ‘दर्पण’सभागृहात गुरुवार दि. ६ जानेवारी २०२२ रोजी राज्यस्तरीय पत्रकार दिनी सकाळी साडेदहा वाजता होणार आहे.

निशांत दातीर यांना यापुर्वी महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण, नंदा फौंडेशन मुंबई, शब्दगंध साहित्य परिषद, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, इंदिरा प्रतिष्ठान व अहमदनगर प्रेस क्लबचा बेस्ट रिपोर्टर असे मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत.

निशांत दातीर यांना दर्पण पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल माजी मंत्री राम शिंदे, अण्णासाहेब डांगे, महादेव जानकर, विशेष सरकारी वकिल उज्वल निकम, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा, नगरच्या पत्रकार बांधवांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. 

‘कोरोना’ परिस्थितीमुळे सन २०१९ व सन २०२० या दोन वर्षांचे पुरस्कार वितरण लांबणीवर पडले होते. यंदाच्या राज्यस्तरीय पत्रकार दिनी या पुरस्कारांचे वितरण आयोजित केले आहे.

सध्याच्या शासन नियमानुसार केवळ ५० लोकांच्या उपस्थितीतच मर्यादित स्वरुपात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे, अशी माहिती संस्थेचे कार्यकारी विश्वस्त विजय मांडके, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव, कृष्णा शेवडीकर, पोंभुर्लेग्रामस्थ व जांभेकर कुटूंबीय यांनी दिली आहे.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !