संघटनेच्या प्रमुख मागण्यांपैकी काही मागण्या पूर्ण झाल्या आहेत. तर काही मागण्या पुढील १५ दिवसात पूर्ण होतील. आरोग्य सेविका यांना आरोग्य सहाय्यक पदावर पदोन्नती देण्याची प्रक्रिया दि. २३ नोव्हेंबर रोजी पूर्ण करण्यात आली. तर आरोग्य सेवकांना आरोग्य सहाय्यक पदावर पदोन्नती देण्याची प्रक्रिया पुढील १५ दिवसात पूर्ण होईल, असे आश्वासन मिळाले आहे.
काही आरोग्य कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार १०, २०, ३० चा लाभ भेटला नाही. त्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून ती लवकर पूर्ण होईल, तसेच मागील फरकासहित लाभ दिला जाईल, असे पत्र जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिले आहे. इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे या पत्रात म्हटले आहे.
काही मागण्या पूर्ण झाल्याने दिनांक १ डिसेंबर पासून सुरु होणारे साखळी उपोषण पुढील पंधरा दिवस पुढे ढकलण्यात येत आहे. मात्र या पंधरा दिवसांत मागण्या पूर्ण नाही झाल्यास पुन्हा संघटनेला उपोषणाचे हत्यार हाती घ्यावे लागेल, असा इशारा अध्यक्ष मनोहर डिसले यांनी दिला आहे.
चर्चा सफळ ठरली
एकीकडे राज्यात पुन्हा निर्बंध लागू झाले आहेत. तर दुसरीकडे आरोग्य संघटनेने १ डिसेंबरपासून साखळी उपोषणाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावले. तसेच डॉ. संदीप सांगळे यांनीही प्रशासन आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आंदोलकांच्या काही मागण्या मान्य झाल्या.