मनात फार काही साठलेलं नसलं तर लिहिणं खूप सोप्पं असतं, तेच जर खूप जास्त असलं तर लिहायला काहीच सुचत नाही. काहीच विषय नसताना तासंतास कित्येक पानं मी लिहायचे, आता दोन ओळी लिहायला तासंतास जातात.
बोल, लिही, रितं करून टाक मन, असं सांगणारे कित्येक भेटतात. पण कसं करायचं हे कोणीच सांगत नाही. लिहायला हरकत नाही पण सुरवातच उमगत नाही आणि बोलायला कोणी ऐकणारं पाहिजे, ऐकल्यावर समजावून सांगणारं पाहिजे, ऐकवणारं नाही.
कधीतरी मग उमगतो एखादा शब्द, सापडतो एखादा धागा जो सगळा गुंता सोडवतो. तोवर वाट बघायची, शब्दांनी आपल्याला आपलंसं करण्याची..!
- शामली दीपाली विजय (अहमदनगर)