आयेशाच्या निमित्ताने..

परवा तो आयेशाचा आत्महत्येच्या आधीचा व्हिडीओ पाहिला. खरंतर आयेशा आणि तिचा पति आरिफ यांचा प्रेमविवाह. तीनचार महिन्यानंतर आरिफ तिला सतत त्रास देऊ लागला. वडिलांकडून तिने पैसे आणूनही दिले. हे असं दोनतीन वेळा झालं.. आयेशाने पोलिस ठाण्यात तक्रार केली. प्रकरण बिघडले, मध्यस्थांनी आयेशाला भरीला पाडून तिला आरिफकडे परत पाठवलं...


आयेशांने त्याला लहानपणापासूनच पाहिले होते, जीवापाड प्रेम केले होते, तोच आज वेगळाचं वागतं होता. मला वाटत प्रियकराचा नवरा झाला होता. त्याच्यात झालेला बदल हळव्या आयेशाला सहन झाला नाही. छळ सहन होत नव्हता. आईवडिलांची अवस्था आयेशाला पहावतं नव्हती.
    
तिने नव-याला सांगतिले मी मरतेय, त्याने सांगितले, "मर ...हवतर त्याचा व्हिडीओ बनव आणि मग मर" हळव्या पोरीनं आईबापाला फोन केला. व्हिडीओ शूट केला अन नदीत उडी मारली. व्हिडीओमध्ये ती सांगतेय, "बहुतेक माझं नशीबचं वाईट होतं म्हणून मला हे सहन करावं लागलं, बस्स मुझे बहना है.." हवेच्या झोक्यासारखी होती ती... हवेत विरुन गेली.
   
लग्न खरतरं आयुष्यातील सुंदर गोष्ट. एकमेकांच्या सोबतीने एकमेकांची स्वप्नं पूर्ण करणं. लग्न जुळणं म्हणजे काय? त्यासाठी पतीपत्नीचे मन आणि मेंदू दोन्हीही जुळावे लागतात. जेव्हा फक्त शरीरं जुळविण्यासाठी लग्नं होतात तेव्हा ती फसतात आणि दुःख जन्माला येतात. हे फसू नयेत म्हणून लग्न तयारीत आपण विविध तयारी करतो. त्यात फक्त मुलीनेच बदलायचं, हे क्रुरपणाचं वाटतं. 

हल्ली मुली मोठ्या असतात. त्यांच्या जीवनपद्धती घट्ट झालेल्या असतात. खाणपिण्याच्या त्यांच्याही सवयी असतात. उठण्याबसण्याच्या सवयीपासून झोपेपर्यंत अचानक एका दिवस सारंच बदलतं. किंबहुना मुलींनी लगेचच तडजोड करावी, अशी काही महाभागांची इच्छा असते. पंचवीस वर्षाच्या सवयी लगेचच बदलतील ?? याचा विचार दुसऱ्यांची मुलगी घरात आणताना विचार करायला हवा.

नव-यानेही थोडं बदललं पाहिजे. तिला समजून घेतलं पाहिजे. घरातील स्त्रियांनी आम्ही केल की सारं सहन मग आता ह्या मुलींनीही सहनच करायला हवं. असा विचार म्हणजे सूडबुध्दीचाच विचार असे मला वाटतं. यासाठी मुलींनीही नव-याबरोबर, सासुबरोबर वेळोवेळी संवाद साधला पाहिजे. यात नव-याची भूमिका फार महत्त्वाची.! माझी आई किंवा बहीण असं वागणार नाहीत, अशी ठाम भूमिका घेऊन बायकोला खोट ठरवू नये.. तिथेच संसार ढासळायला सुरवात होती. दोन्हीही बाजू समोरासमोर आणून सत्याला न्याय देणं फार महत्त्वाचे ...!!!
   
कारण नुकत्याच लाडाकोडातून आलेल्या सा-यांच मुलीना मनाचं संतुलन साधता येईल असं नसतं. दहावी बारावी परीक्षेच्या आधी, निकालानंतर विद्यार्थी आत्महत्या करतात. तेव्हा हळहळ व्यक्त करण्यापेक्षा.. समाजात जास्त मार्क मिळवणा-यांचेच स्थान, अशी जी मानसिकता आहे ती पूसून काढायला हवी. कारण या मुलांच्या आत्महत्या आपल्या शिक्षणपद्धतीच्या चिंधड्या उडवतात. मुलांना कित्ती ते मार्काचे दडपण....!!!
       
शेतकऱ्यांचेही तेच त्यांच्या रोजच्या जगण्याचे वळ त्याच्या गळ्यावर उठले की समाज, सरकार यांची सहानुभूतीची नुसतीच चढाओढ. शेतकऱ्यांच्या शेतीला पूरक ठोस उपाययोजना, जोडधंद्याना अनुदान देण्याच्या सोप्या पध्दती, अल्प व्याजावर कर्जवाटप या सा-या गोष्टी केल्या पाहिजेत. शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचले पाहिजे .सर्वात जास्त बेभरवश्याचा धंदा म्हणजे शेती. त्यावर तज्ञांनी काम केलं पाहिजे, सुधारणा केल्या पाहिजेत.
    
अभिनेता सुशांतने जर त्यानेच काम केलेला 'छिछोरे' एकदोनदा पाहिला असता तर कदाचित त्याने आत्महत्या केली नसती. दुसऱ्यांना ते मिळतय म्हणून रडायचं, मला मिळतं नाही म्हणून रडायचं. जगात रोजचं मरणं भोगतं कितीतरी अबोल दुःख नेटाने जगत आहेत. मनाचं संतुलन जमलय त्यांना?? अपयश, दुःख पचवून पुन्हा उभं राहण्यातच जीवनाची यशस्विता आहे हे शिकविण्यात आपण कमी पडत आहोत असं मला वाटतं.

यशस्वी लोकांचे धडे मुलांना देताना त्या यशाच्या आधी आलेलं अपयश, त्या व्यक्तिचा संघर्षही मुलांना माहित झाला पाहिजे. म्हणून मुलांनी अवांतर वाचन केल पाहिजे. सगळ्यात महत्वाचं जगण्याची विविध कौशल्ये आपल्यामध्ये रुजवायला हवी. जगणं आणि जगवणं कित्ती सुंदर आहे हे आजूबाजूच्या माणसांना जाणवून दिल पाहिजे.
    
एका घरात राहून माणसं एकमेकांचा दुस्वास करत रहातात, मत्सर करत रहातात. मग एखाद हळवं कोकरु या लाटांना तोंड देऊ शकत नाही. अन असा वेडेपणा करुन बसतं..!! डिप्रेशन हा कमकुवतपणा नाही तो बरा होणारा आजार आहे, वेळीच केलेल्या उपचारांनी तो बरा होतोच. हे आपण स्वतःला सांगत रहायला पाहिजे...

आपण जलदुर्गासारखच भक्कम असायला हवं. सातत्याने अंगावर येणाऱ्या लाटांना जमिनीवर घट्ट पाय रोवून तोंड देत राहिले पाहिजे. आपण कशासाठी जगतोय याचं उत्तर ज्यानं त्यानं ठरवायचं आहे.

- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !