माझ्या जगण्याचा केन्द्रबिंदूच 'स्त्री' आहे. मी नेहमीच म्हणते, 'माझी स्त्री' ही नेहमीच आनंदी असायला हवी. इथे 'माझी' स्त्री याचा अर्थच वैश्विक आहे.जगात जेवढ्या स्त्रिया आहेत. तेवढ्या सगळ्या या माझी स्त्रीमध्ये येतात. मला स्त्रीचं मुक्त असणं म्हणजे सुखी असणं, ही व्याख्या मान्य नाही. प्रत्येक स्त्रीला जसं आवडतं तसं जगू देण, तिचा सन्मान करणं यात तिच सुख असतं.
स्त्रीला काहीही सहजासहजी मिळत नाही. तिला नेहमीच स्वतःला सिध्द करावं लागतं. जगासमोर ती स्वतःला सिध्द करत रहाते. मग कुठे जग तिची दखल घेतं. यावरुन मला पुराणातील एक लोककथा आठवतेय. राम सीता जेव्हा एकदा गयेला दशरथाचे पिंडदान करायला जातात. राम सीतेला तयारी करायला सांगून आन्हिक उरकायला जातो. इकडे सीता भात तयार करुन पिंड तयार करते. पिंडदानाची वेळ झाली तरी राम येत नाहीत.
नदीकाठी हे सर्व घडत असते. इतक्यात नदीमधून दशरथाचा हात वर येतो. सीता सासऱ्यांना विनंती करते, 'रामाची वाट पहा', असे म्हणते. पण दशरथ तिला म्हणतात "तु मला पिंडदान कर. तु माझी स्नुषा आहेस. मी तुला अधिकार देतो. तु पिंडदान कर." बरेचदा आग्रह केल्यानंतर सीता पिंडदान करते. दशरथ नाहीसे होतात.
आता खरी गोष्ट पुढेच आहे. राम येतात, सीता सांगते, दशरथांनी मला अधिकार दिले, त्यांना भूक लागली होती, म्हणूनच मी पिंडदान केले. आता राम म्हणजे नैतिकतेचे पालनकर्ता. स्त्रीला हे अधिकार नाहीत, या समाजनियमाचा पालन करणारे. त्यांना ते खोटं वाटलं. सीतेला आता साक्ष काढणं भाग पडलं.
फल्गु नदीला विचारलं. दशरथांनी मला अधिकार दिले ना गं.? फल्गुही पडली \स्त्री जात'. बाईचं कोण खरं धरणार.? ती काही बोललीच नाही. सीता व्याकूळ झाली तिने फल्गुला शाप दिला सत्याकडे पाठ फिरवतेस. तु पालथी वहाशील. काय कारण माहित नाही. फल्गु नदीत आजही फक्त वाळू वर आणि पाणी खाली अशीच स्थिती आहे.
गायीला विचारलं तर गायही रामाला घाबरुन गप्प. सीता संतापली. तिने गायीलाही शाप दिला. तुला नको तिथे तोंड घालायची सवय लागेल. तुझं दर्शन लोक पृष्ठभागाकडून घेतील. एका कावळ्यालाही तिने विचारलं. मग त्यालाही शाप. तुला फक्त एकाच डोळ्याने दिसेल.
तिथे पूजाविधी करणारे पंडे होते. त्यांना विचारलं तर तेही राजासमोर तोंड उघडेनात. त्यांना सीतेने शाप दिला गयेचे पंडे आजपासून फक्त मृतसंस्काराच्या कामी येतील. आणि त्यांना अपवित्र समजलं जाईल.
आता सीता हताश झाली. नदीकाठच्या वडाला तिनं विचारलं. वृक्षराज आपण तरी खरं बोलावं, वृक्षराजनी सर्व सत्य कथन केलं. राम स्तंभित झाला. सीतेच्या प्रामाणिकपणाची त्याला खात्री पटली. गयेला मूळ, काशीला बुंधा, प्रयागला फांद्या पान असलेला हा वटराज आजही लोकांच्या श्रध्देस पात्र आहे.
शापमालेची ही लोककथा मला नेहमीच अंर्तमुख करते. समाजमनाचं आजही हेच वास्तव नाही का.? बलात्कार झालेल्या स्त्रीला कितीतरी प्रश्नांना तोंड द्यावं लागतं. समाजाने स्त्रीवर घातलेली बंधने, मर्यादा त्यातून निर्माण होणारी तिची अगतिकता. यातूनच ही लोककथा निर्माण झाली आहे. हे समाजमनाचं दुबळेपण नाही का.?
मला स्त्री समजलीय असं म्हणतात, ते खोटचं बोलतात ना.? तिला समजून घ्यायला आधी तिचं माणूसपण समजून घ्यावं लागेल. तिचं दुःख पूर्वपार आहे. द्रौपदीने सहन केलेला अपमान आताची एखादी स्त्री जगासमोर आक्रंदून मांडते. ही बदलेली परिस्थिती आहे. तिला बोलायला मिळालं पाहिजे. नव्हे तिनं अन्यायाला प्रतिकार करण शिकलं पाहिजे.
साक्ष मागितली जाणारच. तिला स्वतःला पदोपदी सिध्द करावं तर लागणारच. पण हे शिवधनुष्य तिनं पेललंच पाहिजे. कर्तृत्वाच्या आभाळात तिनं आपली नक्षी कोरलीय. पण सामान्यांतील सामान्य स्त्रीला झेप घ्यायला तिचं आभाळ तिलाच मिळायला हवं. आमेन.
- ©® स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर).