भिंगार खून खटल्याचा निकाल लागला. एक तरूण जीवनातून संपला, तर जन्मठेपेची शिक्षा लागलेले दोन तरूण जीवनभर यातना सोसतील. आपसात चांगले संबंध असणारी व आपसी नातेवाईक असणारे दोन कुटुंब. अचानक किरकोळ व्यवहारातून भांडण होते आणि एका तरुणाचा खून होतो..
काल या खटल्याचा निकाल लागला. चार वर्षामध्ये खूप काळ गेला.. कोरोनाचे दोन वर्ष गेले. खटला ज्यांच्यापुढे आहे, ते न्यायाधीश देखील बदलत गेले. सरकारी अभियोक्ता अॅड. अर्जुन पवार साहेब यांनी खूप मेहनत घेतली.
ही बातमी वाचा - किरकोळ भांडणातून युवकाचा खून करणाऱ्या दोघांना जन्मठेपेची शिक्षा
तर आरोपीच्या वतीने नामांकित व फौजदारी खटल्याचा गाढा अभ्यास असलेल्या वकिलांनी मेहनत घेतली. या सर्वांकडून नेहमीच चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. या खटल्याकडे केवळ मयत युवकाला न्याय मिळावा व आरोपींना मोठी शिक्षा व्हावी, असे सर्वसाधारणपणे न पाहता मोठा विचार करण्याची गरज आहे.
आजचे तरूणाई मोबाईल, मोटारसायकल, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, अशा अनावश्यक व किरकोळ बाबींवरून भांडणे करतात. त्याचे परिणाम एक जीवनातून संपतो आणि उरलेले जीवनभर यातना साेसतात, इथपर्यंत जाणे याचे अपार दु:ख आहे.
आज जात धर्माच्या नावाखाली सशक्त मने असणारी तरुणाई वेगवेगळे झेंडे घेवून, 'तिरंग्या'बरोबर लढाई करत आहे. या युवकांना आपण कोठे जातोय, याचे भान नाही, त्या वाटेवर त्यांचे भविष्य अंधकारमय आहे. त्यामुळे सध्या गरज आहे ती सशक्त भारतासाठी माणुसकी जपणारे मने तयार करण्याची..
- विनोद चव्हाण (सहायक पोलिस निरीक्षक)