या जगाचा नियम आहे की, आपण जितका जगाचा विचार करू, तितकं हे जग आपल्याला जगापासून दूर करत जातं. त्याउलट आपण आपल्या स्वभावाला जागत जसे आहोत, तसे जगायला लागलो की, आपल्या वागण्यात मोकळेपणा येतो.
रोज रात्री झोपताना आपण किती माणसांना दुखावलं, किंवा किती माणसांकडून दुखावलो गेलो, याचा हिशोब लावत बसतो. त्यापेक्षा आज किती हसलो, आज आपण इतरांना किती हसवलं.? किती जगलो आणि किती आयुष्य फुलवली, याचा विचार करून झोपलो तर सुखाची झोप येते.
आपल्या आयुष्यात अडथळे तर पाचवीलाच पुजलेले असतात. ही खूणगाठ आपण स्वत:शीच बांधून घ्यायला हवी. असे केले समोर आलेल्या प्रश्नांकडे आपण संकट म्हणून पहात नाही. तर आपल्या संयमाची, ताकदीची, एक परीक्षा म्हणून पहायला लागतो. त्यातून मार्गही काढत जातो.
खरंतर ज्याच्या आयुष्यात संकटंच नाहीत, असा मनुष्य शोधणे कठीण आहे. पण जर असा मनुष्य असलाच तर त्याचं आयुष्यही जिवंत पुतळ्यासारखंच असतं. नावाला 'जिवंत' फक्त. त्यामुळे संकटं येतील, संकटं जातील.. पण आयुष्याची ही वर्ष सरकली तर ती कधीच परत येणार नाहीत.
एकदा गेलेली वेळ पुन्हा कधीच येत नाही. मग ती अशी वाया जाऊ देण्यात काय अर्थ आहे.? त्यामुळे जग काय म्हणेल, जगाला काय वाटेल याचा फार विचार न करता जगाच्या हातावर तुरी देत आपल्याला आपल्या वाटणीचं जगून घेता यायला हवं. बस इतकंच..!
- अजय सोनवणे (घोडेगाव, जि. अहमदनगर)