महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नगर येथील सावेडी शाखेने प्रकाशित केलेला 'वारसा' दिवाळी अंक हाती पडला नि बालपणाच्या आठवणीत मन रमून गेले.. खरंच, दिवाळी अंकाचा विषय काय असावा हे खूप महत्वाचे असते. तसं पाहिलं तर आजकाल आपले वाचन कमीच असते.
वेळेचा ताळमेळ घालणं प्रत्येकाला जमेलच असं नाही. त्यात आपली आवड जपणंही खूप कमी लोकांना जमंत; परंतु असा अंक जर हाती पडला तर प्रत्येक व्यक्ती तो पूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवणारच नाही. इतक्या उत्कृष्ट अंकाची निर्मिती करणारे माननीय नरेंद्र फिरोदिया सर आणि माननीय जयंत येलूलकर सर यांच्या कल्पनाशक्तीला दाद द्यायला हवी.
सामान्यातले असामान्य झालेल्या बऱ्याच आदरणीय व्यक्तींचे बालपण वाचताना प्रत्येकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्याचे मोलाचे काम करणारा वारसा अंक... 'मीही घडू शकतो', ही प्रेरणा देणारा हा अप्रतिम अंक आहे.
कविता लिहिणाऱ्या नवोदितांमधून हिऱ्यांना निवडणं आणि त्यांना जगासमोर आणून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणं हे काम तर खरंच खूप कौतुकास्पद. हेच वेगळेपण जपून, आपणही लिहू शकतो हा विश्वास निर्माण करत कवयित्री, कवींना उत्तम व्यासपीठ देणारा हा वारसा मनामनावर राज्य करतोय..
मोरपिशी रंग लेवून, विविधांगी फुलणारा, मनामनात आत्मविश्वास जागवणारा, मायेची पखरण करणारा, भूतकाळात घेऊन जाणारा नि भविष्याची मुहूर्तमेढ रोवणारा वारसा... खरंच हा मनामनाचाच आरसा.. प्रत्येकाने आवर्जून वाचलाच पाहिजे.
- सायली सुहास देशपांडे (अहमदनगर)