आसाम रायफल्सचे ३ जवान शहीद
चार जवान गंभीर अवस्थेत
आयईडीचा स्फोट करुन गोळ्याही झाडल्या
इंफाळ - मणिपुरची राजधानी असलेल्या इम्फाळपासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर चंदेल जिल्ह्यात अतिरेक्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात आसाम रायफल्सचे ३ जवान शहीद झाले आहेत. तर चार जवान गंभीर जखमी झाले आहेत. ज्या अतिरेक्यांनी हा हल्ला केला, ते एका स्थानिक ग्रुप पीपुल्स लिबरेशन आर्मीचे होते.
भारत आणि म्यानमारच्या सीमेवर अतिरेकी समुहांविरोधात एक ऑपरेशन सुरू केलेले आहे. त्यात हे जवान अतिरेक्यांना सापडले. आधीच निशाणा लावून बसलेल्या अतिरेक्यांनी जवानांवर दिसताक्षणीच गोळ्या झाडल्या. या हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने अतिरेक्यांचा शोध घेण्याची मोहिम हाती घेतली आहे.
तसेच भारत-म्यानमार सीमेवर चौकशी सुरु करण्यात आली आहे. अतिरेक्यांनी नोव्हेंबर २०१९ मध्येही चंदेल जिल्ह्याजवळील आसाम रायफल्सच्या कँपवर हल्ला केला होता. त्यावेळी त्यांनी भारतीय जवानांच्या कँपवर बॉम्ब फेकले होते. यानंतर दोन्ही बाजुंनी गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.
नंतर अतिरेक्यांनी पळ काढला होता. या हल्ल्यात सैन्याचा कोणताही जवान जखमी झाला नव्हता. यावेळी मात्र आसाम रायफल्सचे तीन जवान शहीद झाले आहेत.