अहमदनगर - काम वेगळे असले तरी विचार एक असेल तर विजय निश्चित असतो. कम्युनिस्टांचा बालेकिल्ला असलेल्या अहमदनगरमध्ये शंभरी ओलांडलेल्या एका विचारसरणीच्या अशाच तीन संस्था काही वर्षांपूर्वी एकत्र आल्या. या तिन्ही संस्था निवडणुकीत सक्रीय झाल्यामुळे इतिहास घडला होता. आता पुन्हा एकदा या संस्था एकत्र आल्या आहेत.
हिंद सेवा मंडळ, नगर जिल्हा वाचनालय व नगर अर्बन बँक या शंभरी पार केलेल्या जिल्ह्यातील महत्वाच्या संस्था आहेत. सत्कार समारंभानिमित्त नुकत्याच तिन्ही ऐतिहासिक संस्था एकत्र आल्या. त्यामुळे हा सत्कार समारंभही ऐतिहासिक ठरत आहे, असे प्रतिपादन हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी यांनी केले.
हिंद सेवा मंडळाने अर्बन बँकेच्या निवडणुकीत सुरवातीपासून सक्रीय सहभाग घेतला. स्व. दिलीप गांधी यांचे पॅनल निवडून आणण्यासाठी श्रीरामपूर विभागाची जवाबदारी सांभाळली. अर्बन बँक व जिल्हा वाचनालय या सर्वसामान्यांसाठी काम करणऱ्या संस्थांच्या नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन जोशी यांनी केले.
हिंद सेवा मंडळाने नगर अर्बन बँक व नगर जिल्हा वाचनालयाच्या नूतन पदाधिकारी व संचालकांचा सत्कार केला. संस्थेचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक, सचिव संजय जोशी, कार्याध्यक्ष अजित बोरा यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमा निमित्त तीन ऐतिहासिक जुन्या संस्था एकत्र आल्याने हा सत्कार समारंभ रंगला.
अर्बन बँकेसदर्भात केला 'हा' निर्धार - सावेडी भागात नगर जिल्हा वाचनालयाची लवकरच अद्यावत इमारत उभी राहणार आहे. त्यासाठी व अर्बन बँक लवकर संकटातून बाहेर येण्यासाठी नवे पदाधिकारी उत्तम काम करतील, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी अर्बन बँकेच्या उपाध्यक्षा दीप्ती गांधी, संचालक अनिल कोठारी, महेंद्र गंधे, ईश्वर बोरा, संपत बोरा, जिल्हा वाचनालयाचे संचालक चंद्रकांत पालवे, डॉ. राजा ठाकूर, ज्योती कुलकर्णी, शिल्पा रसाळ, अजित रेखी, किरण अग्रवाल, संजय चोपडा, गणेश अष्टेकर, राहुल तांबोळी, तन्वीर खान, अनंत देसाई यांचा सत्कार झाला.
हे कारण असू शकते.. - अर्बन बँकेत पुन्हा गांधी गटाची सत्ता आली आहे. मात्र, रिझर्व बँकेच्या एका आदेशामुळे व्यवहारांवर बंधने आली आहेत. या बँकेला जनसामन्यांत पुन्हा विश्वास मिळवून देण्यासाठी या तीन संस्था एकत्र आल्या असल्याचे म्हटले जात आहे.
यावेळी सीताराम सारडा महाविद्यालयाचे अध्यक्ष मकरंद खेर, भाईसथ्था नाईट स्कूलचे अध्यक्ष डॉ. पारस कोठारी, मेहेर इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष जगदीश झालानी, सारडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे, रणजीत श्रीगोड, बी. यू. कुलकर्णी, विठ्ठल ढगे, भनगडे, कैलास बालटे, अभिजित लुणिया उपस्थित होते.