अहमदनगर - शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळ्याची व्याप्ती वाढतच चालली आहे. पुण्यातून हा घोटाळा उजेडात येताच त्याची वेगाने चौकशी सुरू झाली आहे. अनेकांची धरपकड सुरू झाली आहे. या कारवाईचे धागेदोरे आता संगमनेरमार्गे नगर जिल्ह्यात आले आहेत. त्यामुळे नगरमधील क्लासचालकही धास्तावले आहेत.
राज्य शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष, उच्च आणि माध्यमिक औरंगाबाद विभागीय माजी अध्यक्ष सुखदेव डेरे यांना संगमनेरमध्ये चतुर्भुज करण्यात आले. त्यांना अटक होत नाही, तोच परिक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांचेही संगमनेर कनेक्शन उजेडात आले आहे. ते काही वर्षापूर्वी हे संगमनेरला प्राध्यापक होते.
जर पुण्याच्या सायबर पोलिसांनी या घोटाळ्याच्या मुळाशी जाण्याचे ठरवले, तर नगर जिल्ह्यातही अनेक धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. तुकाराम सुपे यांना अटक झाल्यानंतर माजी परीक्षा परिषद आयुक्त डेरे सुद्धा गजाआड झाले आहेत. दोघांचीही कसून चौकशी सुरू आहे.
हे क्लासचालक रडारवर - या घोटाळ्यात अटक केलेले डेरे यांचे संगमनेर कनेक्शन उजेडात आले आहे. या तालुक्यातील काही क्लासचालक नगरमध्ये आहेत. त्यांनी अत्यंत कमी काळात नगर शहरात नावलौकिक मिळवला आहे. डेरे यांच्या संगमनेर कनेक्शनमुळे नगर शहरातील 'हे' क्लासचालक रडावर आहेत.