सोलापूर - पुण्याच्या पुरुष व महिला संघानी वरिष्ठ गटाच्या राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या स्पर्धेतील सर्वोत्कष्ट अष्टपैलू खेळाडूसाठी असलेली राणी अहिल्या पुरस्काराची मानकरी प्रियांका इंगळे ठरली. पुरुष गटातील राजे संभाजी पुरस्काराचा मान प्रतीक वाईकर याने मिळवला.
या स्पर्धेतील तृतीय स्थान महिला गटात उस्मानाबाद आणि पुरुष गटात सांगलीने मिळवले. महिलांच्या अंतिम सामन्यात गतविजेत्या पुण्यास ठाणेवर १३-१२ असा ३.४० मिनिटे राखून विजय मिळवला. त्यासाठी विशेष प्रयास करावे लागले नाही.
प्रियांका इंगळे (२.००,१.४० मिनिटे व ५ गुण), दिपाली राठोड (२.१०,१.०० मिनिटे २ गुण) व श्वेता वाघ (१.५०, १.५०) यांनी शानदार खेळी केली. त्यामुळे पुण्याने मध्यंतरास ९-५ अशी आघाडी घेतली होती. तर ठाण्याच्या रेश्मा राठोड (१.५० मिनिटे ४ गुण), मृणाल कांबळे (४ गडी) व कविता घाणेकर (२.२० मिनिटे) यांची खेळी अपुरी पडली.
पुरुष गटात पुण्याने गतविजेत्या मुंबई उपनगरला १७-१६ असे एका गुणाने नमवले. डोळ्याचे पारणे फेडणारा हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. मध्यंतरापर्यंत ८-८ अशी बरोबरी झाल्यानंतर निर्णायक आक्रमणात मुंबई उपनगरचा गुण मिळविण्याचा तर पुणे संरक्षणात बचाव करण्याचा प्रयत्न करीत होता. तर सर्व प्रेक्षकांचे लक्ष सामना संपल्याची पंचाची शिट्टी कधी वाजते याकडे होते.
अखेर शेवटच्या मिनिटात पुण्याने बचाव करीत बाजी मारली. पुण्याच्या मिलिंद करपे ( ५ गुण व १.०० मिनिटे), प्रतीक वाईकर (३गुण व १.४०) व सागर लेंग्रे (१गुण व १.४०) यांची अष्टपैलू खेळी संघाच्या विजयात महत्वपूर्ण ठरली. मुंबई उपनगरच्या अक्षय भोंगरे ( ५ गुण व १.१०,१.०० मिनिटे), अनिकेत पोरे (२ गुण १.३०,१.००), ऋषिकेश मुरचावडे (१गुण, १.३०,१.१०) याची अष्टपैलू लढत अपुरी पडली.
लघुत्तम आक्रमणाच्या डावात महिला गटात उस्मानाबादने रत्नागिरी वर २३ सेकंदाने तर पुरुष गटात सांगलीने ठाणेवर ११ सेकंदानी मात केली. महाराष्ट्र खो खो संघटनेचे माजी अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे आयोजन वेळापूर येथील अर्धनारी नटेश्वर क्रीडा मंडळाने केले होते.
पारितोषिक वितरण सोहळा आमदार शहाजीबापू पाटील, बबनराव शिंदे, दीपक साळुंखे- पाटील, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उत्तमराव जानकर यांच्या हस्ते झाला. स्पर्धेचे सचिव जावेद मुलाणी यांनी प्रास्ताविक केले. तर समाधान काळे यांनी सूत्रसंचलन केले.
यावेळी यावेळी भारतीय खोखो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव, महाराष्ट्र खो-खो संघटनेचे सरचिटणीस गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अरुण देशमुख, माजी सचिव जे. पी. शेळके आदी उपस्थित होते.
सर्वोत्कष्ट खेळाडू - पुरुष - अष्टपैलू आणि राजे संभाजी पुरस्कार, प्रतीक वाईकर (पुणे) संरक्षक - ऋषिकेश मुरचावडे (मुंबई उपनगर). आक्रमक - मिलींद कुरपे (पुणे). महिला - अष्टपैलू आणि राणी अहिल्या पुरस्कार - प्रियांका इंगळे (पुणे), संरक्षक - श्वेता वाघ (पुणे), आक्रमक - रेश्मा राठोड (ठाणे).