'या' खात्यातील कर्मचाऱ्यांच्या व्यथा आता थेट न्यायालयात..

औरंगाबाद - मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्ययालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एसटी कर्मचाऱ्याची पत्नी पुष्पा येळवंडे यांनी विधिज्ञ सुविध कुलकर्णी व विधिज्ञ प्रतिक्षा काळे यांच्या मार्फत ही याचिका दाखल केली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्यासंदर्भात ही याचिका दाखल केली आहे. नुकतीच या याचिकेवर पहिली सुनावणी पार पडली. यावेळी मा. न्यायमूर्ती  एस व्ही गंगापूरवाला व न्यायमूर्ती आर एन लड्डा यांच्या खंडपीठाने याचिकेची दखल घेत राज्य परिवहन महामंडळ आणि  संबंधित विभागाच्या प्रतिनिधींना नोटिसा बजावण्याचा आदेश पारित केला आहे. 

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने अॅड देशमुख  हे हजर झाले आहेत. त्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने याचिकेवर म्हणणे सादर करण्यासाठी वेळ मागितला. पुढील सुनावणी आठवड्यानंतर ठेवण्यात आली आहे. 

राज्य परिवहन  मंडळाकडून मिळणारे अनियमित तुटपुंजे वेतन व पुरेश्या सोई सुविधा चा  अभाव यामुळे हवालदिल झालेले कर्मचारी आत्महत्येचा पर्याय निवडत आहेत.  महाराष्ट्रातील जवळपास २९ एसटी कर्मचाऱ्यांनी परिस्थिती ला कंटाळून आत्महत्या केली आहे. 

मात्र अद्यापही एसटी कर्मचाऱ्याच्या मागण्यांचा विचार राज्य सरकारसह राज्य परिवहन मंडळ करत नसल्याने अखेर एसटी कर्मचाऱ्याच्या पत्नीने न्यायालयात धाव घेतली आहे. दर चार वर्षाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात करण्यात येणार समझोता करार करा, एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या निकाली काढा, अशा मागण्या आहेत. 

अथवा एसटीचे शासनात विलिनीकरण करा याबाबत संबंधित विभागाला न्यायालयाने आदेश द्यावेत या दोन प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्या या याचिकेच्या माध्यमातुन करण्यात आल्या आहेत.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !