सत्कर्म : जगण्याची गणितं समजून घ्यायला हवी..

सत्कर्म जरूर करावे..
निरपेक्षपणे..
यातच खरा आनंद असतो...
कुणासाठी काहीं करतांना...


त्यांच्या सुखात, दुःखात, अडचणीच्या काळात
त्यांच्या सोबत असताना आपल्या नात्यांना
खऱ्या अर्थानं ओतप्रोत जपण्याची जी भावना असते...

तोच खरा जिवंत संवेदनांचा ओलावा असतो..
त्याचा अनुभव तुम्हाला खूप सुख देऊन जातो..
कधी आपल्याला वेगळे अनुभवही येत असतात.

माणुसकीच्या भावनेने स्नेही मित्रांसाठी,
आप्तांसाठी त्यांच्या अडचणींच्या वेळीं धावून येताना 
आपण तितक्याच समरसतेने 
काही चांगल करण्याचा प्रयत्न करीत असतो.

जेणेकरून त्यांना दिलासा मिळावा, आधार वाटावा...!
पण कधी याचं लोकांनी 
आपल्यावर वेळ आल्यास  पाठ फिरवली तर..?
अपेक्षा कधीच करु नये.
निरपेक्षपणे कोणासाठी काही करतांना 
हे मनातही येतं नसतं कधी आपल्या...

पण ज्यांना जेव्हां आपण आपले मानतो,
त्यांच्याकडून कृतघ्नतेचे दर्शन घडल्यास
आपल्याला हे सत्य स्वीकारताना वेदना होत असतात.. 
हेही तितकंच वास्तव आहे.

तेंव्हा मग घरातली माऊली दबकत का होईना..
आपल्याला बोलून जाते,
"याच्या त्याच्या साठी वेळ काळ न पाहता धावत होता.
त्या लोकांनी त्यांचं बरोबर साधून घेतलं"

अन् तूम्ही म्हणतं रहा,
आपली माणसे आहेत.. चालायचं.!
एखादा आपला नातेवाईक, रक्ताचा, मित्र..
यांच्यासाठी नेहमीच उस्फुर्तपणे 
आपुलकीची भावना ठेवताना,
ती जेव्हां अशी वागत असतील 
तर आपल्यालां वेदना होतीलच ना....!

मग त्या माऊलीच्या प्रतिक्रियेची देखील काय चूक आहे..?
आपल्या डोळ्यांत स्वप्न पाहणाऱ्या 
त्या अर्धांगिनीला याचा चटका बसणं,
स्वाभाविकच आहे.
"हे कलियुग आहे..."

आप्त, गणगोत, बांधिलकी जपण्याचे दिवस गेले..
जी आपल्यावर मनापासुन प्रेम करतात,
आपली हितचिंतक असतात,
कृत्रिमता, खोटेपणा नसतो कधी ज्यांच्या वागण्यात...
तीच खरी आपली माणसे..
बाकी सब कुछ झुट...

तुम्ही गडगंज असाल तर तुमच्या आसपास 
गर्दी करणारी दिखाऊ नाती खूप असतात...
हल्ली नात्यांचं मोजमापही असं मोजलं जात असतं,
हे लक्षात असू द्या.

याला जिथे अपवाद आहे त्यांना मनापासुन सलाम..
नाहीतर सगळ खोटं खोटं चित्र पहायला मिळेल तुम्हाला..
एकदा तुमची गरज संपली,
की विसरून जायचं ही कोणीतरी आहेत आपली...

अशी माणसेच मुळात तकलादू असतात.
केवळ मोठेपणाच दर्शन देत मिरवणाऱ्या 
या लोकांना जिथे स्वार्थ साधायचा आहे,
त्यापलीकडे काहीही देणंघेणं नसतं...

आपणं मात्र यांचं कौतुक, अभिमान बाळगत असतो..
त्यांच्यात गुंतून राहू नका..
विचारही करू नका..
अशी माणसे केवळ औपचारिक म्हणून 
तुमच्याकडे पहात असतात..
नाहीतर मनस्ताप हाती येतो मग...

एखादा मोठ्या पदावर असलेला 
अहंकारी तहसीलदार जेव्हा 
रस्त्यावर भाजी विकणाऱ्या आपल्या गरीब भावाला 
ओळख द्यायला कचरत असेल 
तर त्यासारखी दुर्दैवाची गोष्ट कोणती असू शकते..

रक्ताची नाती अशी फिकी पडू लागली तर,
मग सोन्याने अंग मढविलेल्या 
त्याच्या कुटुंबियांकडून तरी काय अपेक्षा करणार...?
नाईलाजाने हे सारं स्वीकारावं लागतं,
काळच असा आहे...

कोणाशी जवळीक करतांना,
नाती जपताना सगळ्याचं बाजूने विचार करावा लागतो,
नाहीतर मनस्ताप, वेदना 
याशिवाय काहीही हाती येत नसतं...

याला जिथे अपवाद आहे 
त्या नात्यांतील धाग्यांना मनापासुन सलाम..
आपल्या जगात भावना, 
संवेदना असणारी पुष्कळ माणसे होती...!
आता ती शोधावी लागतात..

जी आहेत,
निस्वार्थी, दुसऱ्याच्या सुखात आनंदी होणारी..
त्यांच्यावरच दुनिया चालू आहे.
नाहीतर हे कलियुग आहे,

तेंव्हा फार काहीं विचार करु नका..
डोक्याला हात लावून तर अजिबात बसु नका..
सत्कर्म जरूर करा..
त्यातच आनंद दडलेला असतो..
जिथे स्वार्थ नसतो..
आपलेपणाचं सूख तिथेच लपलेलं असतं ...

असं जर वागता आलं नाही तर,
आपण चुकलो तर नाही ना..?
हे तरी तपासून पहायला हवे..

संत कबीरने आपल्या दोह्यात म्हटले आहे ,
"बुरा खोजन मैं चला..
बुरा न मिलिया कोई,
जो दिलं खोजा अपना,
मुझसे बूरा न कोई...!

जगण्याची गणितं समजून घ्यायला हवी..
माणसे वाचता यायला हवी..
माणूसपण दुर्मिळ होत चाललंय,
याला जपायला हवं...

जगण्याचा मोगरा तिथे सापडेल,
आत्मिक आनंदाची अनुभूती तिथेच मिळेल...
म्हणूनच सत्कर्म करायला हवं...!

- जयंत येलुलकर (अहमदनगर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !