घोडेगाव (ता. नेवासा) - सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेली तरुणाई ही घोडेगावची विशेष ओळख आहे. या तरुणाईने वेगवेगळ्या क्षेत्रात नेहमीच आपला ठसा उमटवलेला आहे. या गुरुवारी गावात एक विशेष गोष्ट घडली. सामाजिक व सांस्कृतीक क्षेत्रात अग्रेसर 'श्री घोडेश्वरी ग्रुप'चे मित्रमंडळी गुरुवारी सायंकाळी तब्बल २० वर्षांनतर एका खास कारणास्तव एकत्र आली. निमित्त होते आपल्या 'दोस्ता'च्या पाठीवर कौतुकाची थाप ठेवण्याचे.
विविध कारणास्तव गावातील ही दोस्तमंडळी तसे एकत्र येतातच. पण 'या' भेटीला 'विशेष' कारण होते. ते म्हणजे घोडेश्वरी ग्रुपचे सदस्य भारत फुलमाळी यांच्या कौतुकाचे. लहानपणापासून सिनेमाची आवड असलेल्या भारत फुलमाळी यांना नुकताच 'दादासाहेब फाळके आयकॉन फिल्म पुरस्कार' प्रदान करण्यात आला. मुंबई येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. या दोस्ताचे कौतुक करायला सर्व एकत्र आले.
श्री घोडेश्वरी ग्रुपचे संतोषभाऊ सोनवणे, योसेफ लोंढे, जावेद इनामदार, रवीदादा चौधरी, नंदू दारकुंडे, उदय जाधव, रमेश वैरागर, दत्तू गवळी, अनिलभैय्या जाधव, अॅड. स्वप्नील सोनवणे, प्रशांत लोंढे, महेश इखे, सत्तार शेख आदी मित्र परिवार उपस्थित हाेते. शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन भारत फुलमाळी यांना सन्मानित केले. माजी उपसरपंच रमेश वैरागर यांचाही वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
ग्रुपचे सर्वच सदस्य सध्या विविध क्षेत्रात नावाजलेले आहेत. सर्वांनाच एकमेकांचा अभिमान आणि कौतुक आहे. मात्र, या कौतुक सोहळ्याच्या निमित्ताने घोडेश्वरी ग्रुपच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. भारत फुलमाळी यांना लहानपणापासून असलेली सिनेमाची आवड, गावातील व्हिडिओ थिएटरमध्ये पाहिलेले सिनेमे, याबद्दल जावेद इनामदार, योसेफ लोंढे, संतोषभाऊ सोनवणे, प्रशांत लोंढे यांनी आठवणी सांगितल्या.
भारत फुलमाळी यांचा आगामी सिनेमा 'प्लेज टू प्रोटेक्ट' लवकरच प्रदर्शित होणार आहे. मात्र तुर्कीसह इतर काही देशांमध्ये फिल्म फेस्टिवलमध्ये या सिनेमाने आपली छाप उमटवली आहे. त्यातील अभिनयासाठी त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या सिनेमाला देखील श्री घोडेश्वरी ग्रुपच्या दोस्तांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
घोडेश्वरी ग्रुपचा खास सदस्य, आधारस्तंभ, सर्वांचे लाडके स्व. रवींद्र जालिंदर टेमकर यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. आपल्याला सोडून गेलेल्या या खास दोस्ताचीही सर्वांना आठवण आली. अन् त्यांच्या आठवणीने सर्वांचे डोळे पाणावले. यापुढेही असेच सर्वांनी एकदिलाने एकमेकांसह सामाजिक कार्यात सक्रीय राहण्याचा निर्धार केला. 'श्री घोडेश्वरी ग्रुप'चा हा 'याराना' सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे.
ही बातमी सुद्धा वाचा - सिनेअभिनेते भारत फुलमाळी यांना ‘दादासाहेब फाळके आयकाॅन फिल्म पुरस्कार’