'ओमायक्रॉन'चा धसका ! शिर्डी विमानतळावर 'ही' खबरदारी घ्या, कोपरगाव तहसीलदारांचे आदेश

शिर्डी - भारतामध्ये कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंटचे कर्नाटकमध्ये रूग्ण आढळून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोपरगाव तहसीलदार विजय बोरूडे यांनी शिर्डी विमानतळावर कोरोना नियमावलींचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना विमानतळ संचालकांना दिल्या आहेत. 
आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग अधिनियम अन्वये कोपरगांव तहसीलदार विजय बोरूडे यांनी शिर्डी विमानतळ संचालकांना हे लेखी आदेश जारी केले आहेत. शिर्डी विमानतळावर जगभरातून भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात. 

नवीन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर प्रवाश्यांची कोरोना तपासणी कोपरगांव व राहाता पंचायत समिती तालुका आरोग्य अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र, काकडी व कोऱ्हाळे येथील आरोग्य पथकाची विमानतळावर नेमणूक करण्यात आली आहे.

या पथकाने येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाश्यांची नोंद ठेवावी, तपासणी करावी व याबाबतचा अहवाल दररोज सायंकाळी ६ वाजेपर्यंत कोपरगांव तहसीलदार यांना सादर करावा, अशा सूचनाही या आदेशात दिल्या आहेत.  

विमानतळावर थॅर्मल स्कॅनर, सॅनिटायझर व प्रवाशांना हात धुण्याची पुरेशी व्यवस्था करावी. जंतुनाशकाने विमानतळ प्रवाशी बैठक कक्ष व परिसराची फवारणी करण्याची दक्षता घ्यावी, असे म्हटले आहे.

कोरोना नवीन व्हेरिएंट, कोरोना नियमावली बाबत माहितीपत्रके, ध्वनीक्षेपकांद्वारे सार्वजनिक उद्घोषणा, बॅनर या माध्यमातून जनजागृती करावी. शारिरीक अंतर, मुख्यपट्टीचा वापर व हात वारंवार स्वच्छ धुणे, हे कोरोना प्रतिबंधात्मक वर्तन प्रवाश्यांना बंधनकारक करावे, असे म्हटले आहे. 

विमानतळावर कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींला क्वारंटाईन करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, असे आदेशही कोपरगाव तहसीलदार तथा घटना व्यवस्थापक यांनी दिले आहेत.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !