दि. 13 डिसेंबरपासून शाळा सुरु करण्यास मान्यता
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडील दिनांक 29 नोव्हेंबर,2021 च्या परिपत्रकान्वये राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असल्याने राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता 1 ली ते इयत्ता 4 थी व महापालिका हद्दीतील इयत्ता 1 ली ते 7 वीचे वर्ग सुरु करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन - शहरी भागातील शाळा सुरु करणेसाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडील दिनांक 10 ऑगस्ट 2021 व दिनांक 29 नोव्हेंबर 2021 रोजीच्या परिपत्रकान्वये महानगरपालिका क्षेत्राकरिता महापालिका आयुक्तयांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे.
नाशिक शहरातील शाळा दिनांक 10 डिसेंबर,2021 नंतर सुरु करणेबाबत, शाळा सुरु करणेपूर्वी नाशिक शहरातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकडून शाळा पूर्वतयारी अहवाल (गोषवारा) मागविण्यात आलेला आहे. दरम्यान, शाळा सुरु करण्यासाठी कुठलीही अडचण नसल्याचा निर्वाळा आरोग्य मंत्र्यांनी देखील नुकताच दिला होता.
पालकांचीही संमती - नाशिक शहरात इयत्ता 1 ली ते 7 वीचे वर्ग असलेल्या एकूण 504 शाळांमध्ये 1,85,279 विद्यार्थी शिक्षण घेत असून 60 टक्के पालकांनी शाळा सुरु करणेस संमती दर्शविलेली आहे.
आयुक्तांचे आदेश - महापालिका आयुक्त नाशिक यांच्या दिनांक 09/12/2021 च्या मान्यतेनुसार व शासनाकडील परिपत्रकानुसार शाळा सुरु करण्यासाठी मागर्दशक सूचनांची अमंलबजावणी करुन नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता 1 ली ते इयत्ता 7 वीचे वर्ग दिनांक 13 डिसेंबर, 2021 पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.