अहमदनगर - 'मोक्का'च्या गुन्ह्यात कारागृहात असलेला कुख्यात गुंड सागर आण्णासाहेब भांड व त्याच्या टोळीने राहुरीच्या कारागृहातून पलायन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून सागर भांड आणि कसबे नावाच्या एका आरोपीला पुन्हा ताब्यात घेतले. पण दोघे जण मात्र अजूनही पसारच आहेत.
राहुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीला लुटले होते. हा गुन्हा सागर भांड व त्याच्या साथीदारांनी केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे पोलिसांनी ही टाेळी जेरबंद केली. भांड वारंवार अशा स्वरुपाचे गुन्हे करत असल्याने पोलिसांनी 'मोक्का' अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव केला.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक बी जी शेखर यांनी त्या प्रस्तावाला मंजुरी दिली. तेव्हापासून सागर भांड व आणखी पाच जणांची टोळी राहुरी कारागृहात होती. शुक्रवारी मध्यरात्री त्याने कारागृहातुन पलायन केले.
सागर भांड आणि त्याची टोळी कारागृहाच्या चार क्रमांकाच्या बराकीत होती. या बराकीच्या मागील बाजुच्या खिडकीचे लोखंडी गज आणि जाळी कापून पाच जणांनी पलायन केले. ही माहिती समजताच पोलिसांनी पाठलाग सुरू केला.
मल्हारवाडी रोडने जात असलेल्या सागर भांड आणि इतर गुन्ह्यात अटकेत असलेला एक आरोपी पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतला. परंतु इतर तिघे जण मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. हे आरोपी रेल्वेने पळून गेले असल्याचा पोलिसांना संशय आहे.