अहमदनगर - कर्तव्यप्रति प्रामाणिक राहून सेवानिवृत्त झालेल्या पोलिस बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी 'पोलिस'च कामाला येतील. आपलाच माणूस कामाला येईल, असे आश्वासन पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले आहे.
सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांच्या अडचणी आणि त्यांची सद्यस्थिती समजून घेण्यासाठी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी रविवारी पोलिस अधीक्षक कार्यालयात संवाद बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या.
पोलिस अधीक्षक मनोज पाटील म्हणाले, तुमच्या संकटकाळात सेवानिवृत्त पोलिसांना कोणीच मदत करणार नाही. आपला माणूसच कामाला येईल. इतर कोणीही पोलिसांच्या मदतीला येत नाही. त्यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अडचणी ऐकून घेतल्या.
सेवानिवृत्त पोलिस संघटनेचे अध्यक्ष निसार शेख, नाथा घुले, यादवराव आव्हाड यांच्यासह सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी निवृत्त पोलिस व कुटुंबियांना वैद्यकीय सवलत मिळावी, अशी मागणी केली.
पेन्शनर कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगाप्रमाणे त्वरीत मिळावी, पेन्शनर बांधवांना पोलिस स्टेशनला चांगली वागणूक मिळावी, अशी विनंती केली. आपल्या मुलांना मध्यवर्ती ठिकाणी ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध व्हावी, अशीही मागणी केली.
पेन्शनरसाठी वाहतूक शाखेच्या कार्यालयामागे ऑफिससाठी खोली मिळावी, सेवानिवृत्त पोलिस असल्याचे ओळखपत्र मिळावे, तसेच शस्र परवाना मंजूर करावेत, निवृत्तीच्या वेळी रखडलेली पदोन्नतीचे लाभ मिळावेत, अशी विनंती केली.
सेवानिवृत्त सहायक फौजदार पाटोळे आणि उपाध्ये यांनी पोलिस खात्यातील आणि गेल्या काही दिवसांत आलेले अनुभव सांगितले. त्यावर संवादात्मक चर्चा करत पोलिस अधीक्षकांनी यापुढे सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना चांगली वागणूक मिळेल, असे आश्वासन दिले.
तसेच सुसंवाद राखण्याचे आवाहन केले. प्रत्येकाला सॅनिटायझर बॉटल, मास्क, अल्पोपहार दिला. तसेच सर्वांना बुके देऊन सत्कार करण्यात आला.
सेवानिवृत्त सहायक फौजदार शरद लिपाने म्हणाले, आम्ही एखाद्या पोलिस स्टेशनला गेलो तर तेथे नीट वागणूक मिळत नाही. पोलिसांना सहकार्य करायचे असेल, माहिती द्यायची असली तर कोणाला द्यावी, असा प्रश्न पडतो.
पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देऊ, सेवानिवृत्त कर्मचार्यांशी चांगली वागणूक देऊन संपर्कात राहण्यास सांगू, असे आश्वस्त केले.